India France Mumbai Summit Pudhari
मुंबई

India France Mumbai Summit: मुंबईतील शिखर परिषदेत हॅमर क्षेपणास्त्रांसह भारत-फ्रान्सचे 21 करार

मोदी-मॅक्रॉन मॅजिकः भारत-फ्रान्सचे नवे पर्व सुरूः संरक्षण क्षेत्रात भागीदारी; क्षेपणास्त्रे, पाणबुड्या खरेदीस सहमती; कर्नाटकात एव्हरेस्ट उंची गाठणाऱ्या हेलिकॉप्टरची निर्मिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एव्हरेस्टला गवसणी घालणाऱ्या हेलिकॉप्टरपासून हॅमरसारख्या भेदक क्षेपणास्त्राची भारतात निर्मिती करण्यासह विविध तब्बल 21 करारांवर मंगळवारी भारत - फ्रान्सने स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबईत झालेल्या शिखर परिषदेत संरक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान आणि आरोग्य अशा प्रमुख क्षेत्रांतील करारांमुळे उभय देशांतील धोरणात्मक भागीदारीला बळकटी मिळणार आहे. मोदी आणि मॅक्रॉन यांनी उभय देशांदरम्यान ‌‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी‌’चीही घोषणा यावेळी केली.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून मंगळवारी मुंबईत लोकभवन इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते.

मुंबईत लोकभवनात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी कर्नाटकातील वेमगल येथे उभारण्यात आलेल्या टाटा-एअरबसच्या (एच 125) लाईट युटिलिटी हेलिकॉप्टरच्या ‌‘फायनल असेंब्ली लाईन‌’चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत झेप घेणारे पहिले हेलिकॉप्टर या प्रकल्पातून उड्डाण घेईल आणि अन्य देशांनाही त्याची निर्यात होऊ शकेल. एअरबस आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्ट्म्स यांचा हा संयुक्त उपक्रम असणार आहे.

मॅक्रॉन यांचे भारताला जय हो !

फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबईतील भेटींनी दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ केले आहेत. मॅक्रॉन यांनी तर ‌‘जय हो‌’ अशी साद घालत आम्ही भारतासोबत आहोत आणि दृढपणे सोबत राहण्याचा फ्रेंच मानस स्पष्ट बोलून दाखविला. मोदी आणि मॅक्रॉन यांनी यावेळी भारत-फ्रान्सच्या वतीने इनोव्हेशन वर्षही जाहीर केले. भारत इनोव्हेशन करतो की नाही, हा आता प्रश्न नाही. तर, भारतासोबत कोण इनोव्हेशनला चालना देणार हा आहे. याबाबत फ्रान्सचे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे. फ्रान्स भारतासोबतचे सहकार्य अधिक दृढ करु इच्छितो आणि इंडोफ्रेंच संबंध अधिक मजबूत करू इच्छितो. आम्ही इथे तुमच्यासोबत आहोत, आणि आम्ही ही साथ सोडणार नाही, असे सांगत जय हो अशी साद मॅक्रॉन यांनी घातली तेंव्हा उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत मॅक्रॉन यांनी जाहीर केले की जी-7 शिखर परिषदेपूर्वी “इनोव्हेशन डे” आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम फ्रेंचभारतीय उपक्रमांच्या नेतृत्वाखाली होईल आणि दोन्ही देशांतील विद्यार्थी व संशोधकांना एकत्र आणेल.

भारत फ्रान्सचा विश्वासार्ह भागीदार

भारत हा फ्रान्सचा अत्यंत विश्वासार्ह भागीदार आहे असे इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. दोन्ही देशातील संबंध हे विश्वास, खुलेपणा आणि महत्त्वाकांक्षेवर आधारलेले आहेत. दोन्ही देशांमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यावर भर दिला जाईल. जागतिक आव्हानावर मात करण्यासाठी मार्गदर्शक आराखड्यावर दोन्ही देश काम करत आहेत, असेही मॅक्रॉन यांनी सांगितले. राफेल लढाऊ विमाने, पाणबुडी किंवा एच 125 हेलिकॉप्टर, फायटर जेट इंजिन अशा क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. भारत आणि फ्रान्सकडे जगाला देण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. युक्रेनमध्ये हल्ले झालेत ते रोखले पाहिजे, यासाठी एकत्र आले पाहिजे. दहशतवादी संघटनांना आम्ही स्पष्टपणे नाकारतो. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. जी-7 संदर्भात बैठक होण्याआधी द्विपक्षीय बैठक घेण्याचा आमचा विचार आहे, असेही मॅक्रॉन यांनी सांगितले.

नवनिर्मिती वर्ष जाहीर

2026 हे ‌‘भारत-फ्रान्स नवनिर्मिती वर्ष‌’ (इनोव्हेशन इयर) सुरू झाल्याची घोषणा करत पंतप्रधान मोदींनी ही धोरणात्मक भागीदारी आता ‌‘जनतेची भागीदारी‌’ बनत असल्याचे सांगितले. स्टार्टअप, एमएसएमई, विद्यार्थी आणि संशोधक यांच्यातील देवाणघेवाण वाढवण्यासाठी नवीन केंद्रे स्थापन केली जाणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

भारत आणि फ्रान्स या दोन देशांतील मैत्री आता नव्या उंचीवर पोहोचली असून, दोन्ही देशांनी ती ‌‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी‌’च्या स्तरावर नेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे आयोजित ‌‘इंडिया-फ्रान्स इनोवेशन फोरम-2026‌’च्या उद्घाटनप्रसंगी ही घोषणा केली.

आरोग्य क्षेत्रासाठी ‌‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय‌’, ‌‘डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर‌’ आणि एयरोनॉटिक्समधील कौशल्य विकासासाठी ‌‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स‌’ स्थापन करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि फ्रान्सची भागीदारी ही जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाची शक्ती ठरेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 2026 हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी ‌‘टर्निंग पॉईंट‌’ ठरेल, असा आशावादही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र

लोथलमधील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलामध्ये फ्रान्ससोबत सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच फ्रान्सच्या लोकांना भारतीय संस्कृतीच्या जवळ आणण्यासाठी, लवकरच फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली.

एव्हरेस्टला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर बनवू : मोदी

भारत आणि फ्रान्स मिळून माऊंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणाऱ्या हेलिकॉप्टरची भारतात निर्मिती केली जाईल आणि संपूर्ण जगाला ते निर्यात केले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. कर्नाटकातील वेमगल येथे उभारण्यात आलेल्या टाटा - एअरबसच्या कारखान्याचे ऑनलाईन उद्घाटन दोन्ही नेत्यांनी केले. याच प्रकल्पावर हे जगावेगळे हेलिकॉप्टर आता तयार होईल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, गेल्या वर्षी फ्रान्स दौऱ्यावर असताना मार्सेलिसला भेट दिली होती. याच शहरातून पहिल्या महायुद्धादरम्यान भारतीय सैनिक युरोपमध्ये दाखल झाले होते. याच समुद्रकिनारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ऐतिहासिक उडी मारली होती !

भारत - फ्रान्स दरम्यान मुंबईत झालेल्या 21 करारांत राजकीय, परस्पर सहकार्य, तंत्रज्ञान, संरक्षण, नवतंत्रज्ञान, आर्थिक क्षेत्रासह स्टार्ट अप, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे.

उन्नत भागीदारी आणि होरायझन 2047 या पथदर्शी आराखड्याच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी दरवर्षी दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री संवाद साधतील.

भारत सरकार आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्यावरील कराराचे नूतनीकरण करतानाच भारतात हॅमर क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी बीईएल आणि सॅफ्रन यांच्यातील संयुक्त उपक्रमावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शविली.

संरक्षणासह महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर, संयुक्त अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास गटाची स्थापना.

अक्षय ऊर्जा सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण, भारत आणि फ्रान्स यांच्यातील दुहेरी कर टाळण्याच्या करारावरील नियमांमध्ये सुधारणा यांसारख्या दस्तऐवजांवर भारत-फ्रान्सदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली.

वैमानिकी क्षेत्रातील कौशल्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी एक इरादा पत्र सामायिक करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT