मुंबई; पुढारी वृत्तसेवा: रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) कर्मचारी रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास जागरुक असतात तसेच ते जीव वाचवणारे, पळून आलेल्या मुलांना वाचवणारे, सामान शोधून काढणारे आणि रेल्वेमार्गे अंमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यादरम्यान अनेक भूमिका बजावतात. चालू वर्षाच्या जानेवारी ते जून २०२२ दरम्यान आरपीएफने सुमारे १.८९ कोटी रुपयांचे सामान परत केले आहे.
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, "अमानत" या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे रेल्वे प्रवासावेळी हरवलेले किंवा विसरलेले मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इ. यासारख्या मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत.
चालू वर्षाच्या जानेवारी ते जून २०२२ दरम्यान, ऑपरेशन 'अमानत' अंतर्गत, आरपीएफने सुमारे १.८९ कोटी रुपयांचे सामान परत केलं आहे. या ६८९ प्रवाशांपैकी ३५४ प्रवाशांचे १.१७ कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
भुसावळ : १४३ प्रवाशांचे रु.२८.१९ लाख रुपयांचे सामान.
नागपूर : ८१ प्रवाशांचे १९.१४ लाख रुपयांचे सामान.
पुणे : ७३ प्रवाशांचे रु.१५.०४ लाखाचे सामान.
सोलापूर : ३८ प्रवाशांचे रु.९.३८ लाख किमतीचे सामान.
वर्ष २०२१ मध्ये देखील 'आरपीएफ'ने १.६५ कोटी रुपयांच्या ६६६ प्रवाशांना सामान परत मिळवले आहे. ३८३ प्रवाशांचे १.०१ कोटी रुपयांचे साहित्य मुंबई विभागातूनच वसूल करण्यात आले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या या कर्मचाऱ्यांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीला अडथळा इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांही तोंड द्यावे लागते.
हेही वाचलंत का?