नंदकुमार सातुर्डेकर :
पिंपरी : सध्या खरी शिवसेना कोणाची, यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत पिंपरी- चिंचवडमधून आजवर सुमारे 1000 जणांनी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे; मात्र ही मोहीम अशी जोरदारपणे सुरू राहिल्यास भविष्यात शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. वाढदिवसानिमित्त मला फुलांचे गुच्छ नको शपथपत्रांचे गठ्ठे हवेत, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील काळाचौकी येथे शाखेच्या उद्घाटनप्रसंगी केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शिवसेनेच्या राज्यभरातील निष्ठावंतांनी शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर मी उद्धव ठाकरे यांच्या प्रति निष्ठा व्यक्त करत असून शिवसेनेतच राहणार असल्याचे स्टॅम्पवर लिहून दिले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाले. त्यांच्यासोबत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत. शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी गटनेते राहुल कलाटे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह सामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबतच दिसत आहे. शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आजवर एक हजाराहून अधिक प्रतिज्ञापत्रे उद्धव ठाकरे यांना पाठविली आहेत. शिवसेना भवन,आकुर्डी, सुलभा उबाळे व माजी आमदार चाबुकस्वार तसेच शिवसैनिक गणेश आहेर यांच्याकडे सुमारे एक हजार प्रतिज्ञापत्रे जमा झाली आहेत. ती उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आली आहेत.
वास्तविक कोणीही एखाद्या पक्षाचे सभासद होताना त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे लेखी देत असतो, मग स्टॅम्प पेपरवर हमीपत्राची उठाठेव कशासाठी, असा प्रश्न केला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र द्यायचे ठरवले तर स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. विशेषत: विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो. विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट, डुप्लिकेट लिविंग सर्टिफिकेट, जातीचा दाखला यासाठी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. उद्या शिवसेनेची हमीपत्र मोहीम अशीच सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना शंभर रुपयांचा स्टॅम्प मिळण्यास अडचण उद्भवू शकते.
एकट्या चिंचवड गावात माझ्याकडे रोज अडीचशे ते तीनशे स्टॅम्प पेपरची विक्री होते पुणे ट्रेझरी येथे जाऊन सोमवार, बुधवार व शुक्रवारी स्टॅम्प आणावे लागतात. गावात तीन विक्रेते आहेत त्यांच्याकडे रोज साधारणपणे 900 स्टॅम्पची विक्री होते.
-कविता कर्नावट , स्टॅम्प व्हेंडर ,चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात साधारण 20 स्टॅम्प वेंडर आहेत त्यांच्याकडे रोज चार ते पाच हजार स्टॅम्प विकले जातात विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट, डुप्लिकेट लिविंग सर्टिफिकेट, जातीचा दाखला यासाठी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. एखाद्या राजकीय कारणासाठी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र दिले गेल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते हे सत्य आहे
– शिवशंकर शिंदे, अॅडव्होकेट काळेवाडी, पिंपरी पुणे