सुरेश मोरे
कोंढवा : ग्राहकांविना शांताई भाजी मंडईमध्ये शांतता पसरली असून, विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी दुकाने बंद केली आहेत. याला महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग जबाबदार आहे. रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायाला त्यांचीच फूस असल्याचा आरोप भाजी विक्रेते करीत आहेत. कोंढवा खुर्द येथे लाखो रुपये खर्च करून प्रशासनाने शांताई भाजी मंडईची उभारणी केली आहे. या ठिकाणी 72 भाजीपाला विक्रीचे गाळे, 20 कपड दुकाने सुरू आहेत.
मात्र, सध्या ग्राहक येत नसल्याने भाजी मंडईची स्थिती वाईट झाली आहे. एकही ग्राहक येथे फिरकत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दररोज ग्राहक येतील, या अपेक्षेने मार्केट यार्डातून भाज्या आणल्या जातात. मात्र, ग्राहकPmc
न आल्यामुळे तो फेकून देण्याची वेळ विक्रेत्यांवर येत आहे. यामुळे पैशांचा चुराडा होतोच, शिवाय कर्जाचा डोंगर उभा राहत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शांताई भाजी मंडई ही एका शांततामय ठिकाणी कौसरबाग रस्त्यालगत आहे.
वर्दळीला व वाहतुकीला कोणताही धोका नाही. शिवाय, आबालवृद्ध नागरिकांना भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी ती सुरक्षित आहे. मंडईलगत कोंढवा पोलिस चौकी आहे. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत हातगाड्या, भाज्यांचे टेम्पो पाहायला मिळत आहेत. यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. छोटे, मोठे अपघातही होत आहेत. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.
या सर्व परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. कारण, गल्लीबोळात व रस्त्यांवर भाजीपाल्याचा अनधिकृत व्यवसाय करणार्यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नाही. यामुळे सुसज्ज भाजी मंडईत शांतता पाहायला मिळत आहे.
– पुष्पा निकम, भाजीविक्रेत्या
भाजी मंडईची संपूर्ण माहिती घेतली जाईल. त्यानंतर या ठिकाणी ग्राहक येण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
-प्रसाद काटकर, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय