बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती एमआयडीसी परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला तालुका पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडे दोन गावठी पिस्तुले, एक रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसे मिळून आली. अमित तानाजी शेंडगे (वय 20, मूळ रा. उस्मानाबाद; सध्या रा. रुई, बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 29) ही कारवाई करण्यात आली. एक युवक गावठी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अधिकारी व कर्मचार्यांना सतर्क केले. तपास पथकाचे अंमलदार राम कानगुडे, नाईक अमोल नरुटे, दत्ता मदने, सदाशिव बंडगर यांनी सापळा रचला.
या वेळी पोलिसांची चाहूल लागताच तो पळू लागला. पोलिसांनी त्याला पकडत त्याची झडती घेतली. त्यात दोन गावठी पिस्तुले, एक रिव्हॉव्हर व जिवंत काडतुसे त्याच्याकडे मिळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. ही शस्त्रे तो कोणाला विकणार होता, यासंबंधी आता पोलिसांकडून तपास केला जात आहे. तालुका पोलिस ठाण्यात शेंडगे याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.