RSS chief Mohan Bhagwat on BJP government
मुंबई : "बांगलादेशात सव्वा कोटी हिंदू आहेत, एकत्र आले तर काही करू शकतात. त्यांनी एक होणे गरजेचे आहे. त्यांनी ठरवलं लढायचं, मागे हटायचं नाही. तर जगभरातील सर्व हिंदू त्यांना मदत करतील. माझं म्हणणं आहे की, आपल्याला सजग राहायला हवं. आणखी कोणत्या सुरक्षेची आवश्यकता नाही, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (दि. ८) सांगितले. ते मुंबई येथे आरएसएसच्या व्याख्यानमालेत बोलत होते.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, "भाषेच्या आधारावर समाजात भेदभाव नाही. काहींकडून जाणीवपूर्वक असे भेदभाव निर्माण केले जात आहेत. स्थानिक प्रश्नाला मोठं करू नये. मात्र काही जण अशा गोष्टींना खतपाणी घालतात. राजकारणी त्यांचं काम करतात. आपण भारताच्या एकतेसाठी एकत्र आलं पाहिजे."
भ्रष्टाचार व्यवस्थेत नाही माणसाच्या मनात असतो. मासा पाण्यात असताना कधी पाणी पितो कळत नाही, त्याप्रमाणे सरकारमध्ये कधी भ्रष्टाचार होतो ते कळत नाही. संघ स्वयंसेवक गरीब असला तरी भ्रष्टाचार करणार नाही, असा विश्वास व्यक्त करत स्वयंसेवकांना भ्रष्टाचाराविरोधात उभे राहण्याचे सांगितले असल्याचे भागवत म्हणाले.
नवीन तंत्रज्ञान येत आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) येणार आहे. तंत्रज्ञानाला नाकारलं जाऊ नये, मात्र एआय आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग रोजगारावर परिणाम होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. केवळ यंत्रांद्वारे होणाऱ्या प्रचंड उत्पादनापेक्षा, लोकांच्या सहभागातून होणाऱ्या उत्पादनावर भर द्यायला हवा. आपल्याकडील हातांना काम हवंय. रिकाम्या हातांना काम मिळालं नाही तर गुन्हेगारी, नक्षलवाद वाढतो, असा इशाराही भागवत यांनी केंद्र सरकारला दिला.
"आपल्याला दहशतवादाविरोधात एकत्र काम करायचे आहे आणि त्यासाठी परदेशातून येणाऱ्या लोकांची कसून तपासणी करणे आवश्यक आहे. आपण इथल्या स्थानिक नागरिकांना, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, त्यांना रोजगार देऊ; पण बेकायदेशीरपणे आलेल्या विदेशी नागरिकांना काम देता कामा नये. सुरक्षेच्या बाबतीत सतर्कता किती महत्त्वाची आहे, हे दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या उदाहरणावरून समजते. तिथे एका जागरूक नागरिकाला मिळालेल्या चिठ्ठीमुळे पोलिसांना मोठा कट उधळून लावता आला आणि संभाव्य अनर्थ टळला," असेही भागवत यांनी नमूद केले.
"आजच्या काळात शेती प्रश्नावर सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. जेव्हा ३५० गावे एकत्रित येऊन काम करतात, तेव्हा मोठे बदल घडून येतात, हे आपण विसरता कामा नये. जैविक शेतीचा अवलंब केल्यास शेतकरी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होतो आणि गुलामगिरीतून मुक्त होतो. दुर्दैवाने, आजचा सुशिक्षित वर्ग आपल्या ज्ञानाच्या अहंकारात गुरफटलेला असून तो शेतीकडे दुर्लक्ष करत आहे, हे चित्र बदलले पाहिजे. केवळ शेती करून चालणार नाही, तर गावातच 'शेती प्रक्रिया केंद्रे' (Processing Units) उभी राहिली पाहिजेत. तसेच, शेतकऱ्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शेतकरी कुटुंबात मुली देण्याची मानसिकता समाजात निर्माण व्हायला हवी," अशी अपेक्षाही भागवत यांनी व्यक्त केली.
भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील. त्याचे मनसुबे कदापि पूर्ण होणार नाहीत. २०० वर्षांत इंग्रज भारताला तोडू शकले नाहीत. आता ते अखंड भारतात कसं काय होईल. भारताला तोडणं आता शक्य नाही. भारताच्या विभाजनापेक्षा आता २०४७ मध्ये अखंड भारताच्या उदयाची कल्पना करा. अखंड भारत होईलच, असा विश्वास व्यक्त करत आम्ही सरकार चालवत नाही, सरकार तेच (भाजप) चालवतात. आम्ही केवळ काही गोष्टी सांगतो, असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. संघ सांगेल तेव्हा निवृत्त होईन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाला संघाचं समर्थन आहे. संविधानाने ज्यांना आरक्षण दिलं आहे त्यांना जोपर्यंत त्यांची गरज संपली नाही तोपर्यंत ते राहायला हवं. ज्यादिवशी गरज संपली आहे त्यावेळी त्यांनी सांगावे म्हणजे आरक्षणाचा लाभ गरजवंतांना देता येईल. राजकारणी जातवादी नाहीत, समतावादी नाहीत, तर ते व्होटवादी आहेत. जातीयवाद संपू शकतो, फक्त सद्भावना असली पाहिजे, असा विश्वासही मोहन भागवत यांनी व्यक्त केला.