

Mohan Bhagwat RSS Dasara speech :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या प्रस्थापित अर्थव्यवस्थेवर (Established Economic System) गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत, स्वदेशी आणि स्वावलंबन (Self-Reliance) हाच यावरील खरा उपाय असल्याचे स्पष्ट केले.
आज (दि. २) आरएसएसच्या दसरा मेळाव्यात संघाच्या स्वयंमसेवकांना संबोधित करताना भागवत यांनी सध्याच्या विकास पद्धतीमुळे निर्माण झालेल्या दोषांवर बोट ठेवले. ते म्हणाले की, या अमर्याद विकासामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे. आर्थिक सामर्थ्य काही निवडक लोकांच्या हातात एकवटत आहे, ज्यामुळे सामाजिक शोषण आणि पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. एवढेच नव्हे, तर नफ्यावर आधारित या दृष्टिकोनातून समाजात अमानवीयतेचे दोष निर्माण होत आहेत.
जागतिक व्यापारावर भाष्य करताना भागवत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. "आयसोलेशनमध्ये (Isolation) कोणताही देश राहू शकत नाही, अवलंबत्व आवश्यक आहे. मात्र, हे अवलंबित्व हतबलता (Compulsion) नसावी, तर स्वतःच्या इच्छेवर आधारित असायला हवे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावर मात करण्यासाठी त्यांनी स्वदेशीचा आग्रह धरला. स्वदेशी म्हणजे आयात-निर्यात पूर्णपणे थांबवणे नव्हे, तर आपल्या अटींवर जागतिक व्यवहार करणे होय. देशाच्या धोरणांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली न होता स्वेच्छेने व्हावा. घरात तयार होणाऱ्या गोष्टींसाठी बाहेरच्या वस्तूंचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करताना त्यांनी हिमालयीन क्षेत्राचा विशेष उल्लेख केला. "गेल्या काही वर्षांत पर्यावरण बदलामुळे हिमालय भागात मोठ्या घटना घडत आहेत. जर विकासाच्या सध्याच्या पद्धतीमुळे हिमालयासारख्या संवेदनशील परिसराला धोका निर्माण होणार असेल, तर सरकारने या विकासाचा पुनर्विचार करायला हवा," असे मत भागवत यांनी मांडले.
जनतेच्या हिताला समोर ठेवून नीती (Policies) तयार न झाल्यास समाजात असंतोष निर्माण होतो, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी त्यांनी अमेरिकेसारख्या देशांनी लागू केलेल्या टॅरिफ (Tariffs) धोरणांचा उल्लेख करत, प्रत्येक देशाने केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करण्याऐवजी जागतिक आणि पर्यावरणीय जबाबदारीने वागणे महत्त्वाचे असल्याचे सूचित केले.