

Mohan Bhagwat on Muslims In RSS:
राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाच्या (RSS) शताब्दी महोत्सवानिमित्त बंगळुरूमध्ये झालेल्या कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मोहन भागवतांनी संघ हा एक व्यक्ती किंवा राजकीय पक्ष नाहीये तर, संघ एका व्यक्ती किंवा पक्षाला समर्थन देत नाही तर संघ धोरणांना पाठिंबा देतो असं सांगितलं.
या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांना संघातील मुस्लिमांच्या स्थानाबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यांना संघात मुस्लिमांना RSS च्या शाखेत येण्याची परवानगी आहे का असं विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या धर्माच्या लोकं संघात येऊ शकतात असं उत्तर दिलं.
मोहन भागवत म्हणाले, 'संघात ना ब्राम्हण, ना इतर जातीच्या, मुस्लिम, ख्रिश्चन व्यक्तीला येण्याची परवानगी नाही. मात्र संघ शाखेत वेगवेगळ्या पंथाच्या मुस्लिम किंवा ख्रिश्चन व्यक्तींना जर ते त्यांचे वेगळेपण बाहेर ठेवून आले तर त्यांना स्थान आहे. ज्यावेळी तुम्ही शाखेत येता त्यावेळी तुम्ही भारत मातेचे पुत्र म्हणून येता. मुस्लिम आणि ख्रिश्चन शाखेत येऊ शकतात. मात्र आम्ही ते कोण आहे हे विचारणार नाही.'
त्याचबरोबर मोहन भागवत यांनी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी आरएसएस ही नोंदणीकृत संस्था का नाहीये असा प्रश्न विचारतात. याबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले, 'याबाबतचं उत्तर अगणितवेळा देण्यात आलं आहे. मात्र जे हा प्रश्न सातत्यानं विचारत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा याचं उत्तर देतो. संघाची स्थापना ही १९२५ साली झाली आहे. तुम्ही आम्ही ब्रिटीश सरकारकडे नोंदणी करावी अशी अपेक्षा करता का?'
ते पुढं म्हणाले, 'भारत स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्याही संस्थेला नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आलं नाही. व्यक्ती समुह संस्था अशी कायदेशीर वर्गवारी करण्यात आली. आमची वर्गवारी ही व्यक्ती समुहाची संस्था यात होते. आम्ही एक संघटना म्हणून ओळखलो जातो.'
भागवतांनी आमच्या संस्थेवर तीनवेळा बंदी घालण्यात आली. त्यामुळं आम्हाला सरकार मान्यता आहे. जर आम्हाला सरकारची मान्यता नसती तर ते आमच्यावर बंदी घालणारे कोण. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी न्यायालयानं ही बंदी नाकारली आहे. अनेकवेळा सभागृहात, संसदेत आरएसएस समर्थनात आणि विरोधात दोन्हीकडून वक्तव्य केली जातात. प्रश्न विचारले जातात. कायदेशीररित्या, तथ्य पाहिलं तर आम्ही एक संघटना आहोत. आम्ही घटनाबाह्य नाही. त्यामुळं आम्हाला नोंदणी करण्याची गरज नाही. अनेक गोष्टींची नोंदणी नसते. एवढंच काय तर हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाहीये.