

Mohan Bhagwat On NOTA Voting: नागपूर महानगरपालिका निवडणूकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आज (दि. १५ जानेवारी) मतदानाचे कर्तव्य बजावले. महाल येथील नागपूर नाईट हायस्कुल येथील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केले. त्यांच्यासमवेत माजी सरकार्यवाह व कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी देखील होते.
सरसंघचालक म्हणाले, लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदान महत्त्वाची बाब आहे. ते सर्व नागरिकांचे कर्तव्यही आहे. आपल्याला जो योग्य वाटतो, त्या उमेदवाराला मत देणे हे महत्त्वाचे आहे. जनहिताचा विचार करून मतदान केले पाहिजे.मतदान करण्याबद्दल निवडणूक आयोग ही सांगत असते, आम्ही ही सांगत असतो, याचा परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल.
नोटा म्हणजे सर्वांना आपण रिजेक्ट करतो. मात्र प्रत्यक्षात अव्हेलेबल मधून बेस्ट निवडले पाहिजे. अराजक म्हणजे राजा नसणे ही स्थिती आणि ती सर्वात वाईट असते. महाभारतात देखील हे सांगितले आहे. त्यामुळे अव्हेलेबलमधून बेस्ट निवडले पाहिजे. जेव्हा आपण नोटाचा वापर करतो तेव्हा आपण नको असलेल्यालाच मदत करत असतो, असेही डॉ.भागवत म्हणाले.
दरम्यान, राज्यभरात २९ महापालिकांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक ठिकाणी महायुती अन् महाविकास आघाडीत फाटाफूट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू जवळपास २५ वर्षानंतर एकत्र आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची अन् राज्याची राजकीय दिशा ठरवणारी ठरणार आहे.
आज मतदानाला सुरूवात झाल्यापासूनच मतदान यादी घोळ, शाई ऐवजी मार्करचा वापर अन् बोगस मतदान यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अनेक ठिकाणी इव्हीएम मशीन देखील बंद पडल्यामुळं नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे.