BMC Health Budget Pudhari
मुंबई

BMC Health Budget: मुंबई महापालिकेच्या आरोग्य अर्थसंकल्पात 7,456 कोटींची तरतूद; ‘टीबी-मुक्त मुंबई’ ते एचपीव्ही लसीकरणावर भर

डायलिसिस सेवा विस्तार, एआय आधारित नेत्रतपासणी, 50 जेनेरिक मेडिकल आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेला चालना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या 2026-27 च्या आरोग्य अर्थसंकल्पात आरोग्यासाठी 7456.80 कोटीची इतकी तरतदू करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 6104 , 75 कोटीची रुपयांची तरतूद करण्यात आली होती.डायलिसिस सेवा विस्तार, एचपीव्ही लसीकरण आणि ‌‘टीबी-मुक्त मुंबई‌’ यासह योजनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. “समृद्ध मन, निरोगी जीवन : आमचे नागरिक हाच आमचा सर्वोत्तम ठेवा” या ध्येयवाक्याखाली प्राथमिक ते तृतीयक आरोग्यसेवा बळकट करण्याचा आराखडा मांडण्यात आला आहे. मुंबईकरांचे ‌‘डॉक्टर‌’होवून आयुक्त भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पात केलेल्या वैद्यकीय तरतुदींवर हा दृष्टीक्षेप-

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत दरवर्षी 60 लाखांहून अधिक बाह्यरुग्ण, 2.50 लाखांहून अधिक अंतर्गत रुग्ण आणि सुमारे 1.50 लाख शस्त्रक्रिया केल्या जातात. उपनगरी रुग्णालयांत 53 लाख बाह्यरुग्ण आणि 1.90 लाखांहून अधिक अंतर्गत रुग्णांना सेवा दिली जाते. एकूणच, डिजिटल आरोग्य प्रणाली, तंत्रज्ञानाधारित निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशिक्षणावर भर देत ‌‘सर्वांसाठी सुलभ, वाजवी आणि दर्जेदार आरोग्यसेवा‌’ देण्याचा पालिकेचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाला आहे.

मे 2025 पासून पालिकेच्या सर्व दवाखान्यात व प्रसुतीगृहांमध्ये आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे - आपला दवाखान्यात रूग्णांचे तपासणी अहवाल एचआयएमएस प्रणालीच्या मॉड्युल्स अंतर्गत डिजिटल स्वरूपात नोंदविण्यास सुरूवात झाली. आतापर्यंत ये 20 लाखांहून अधिक रुग्णांचे तपासणी अहवाल डिजिटल नोंदविण्यात आले आहेत.

एआय आधारित नेत्रतपासणी

स्मार्ट नेत्र ज्योती उपक्रमांतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने आणि आपला दवाखाना येथे मधुमेही रूग्णांसाठी मधुमेहजन्य नेत्ररोगाकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित मोफत नेत्रतपासणी व उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

-------

पीपीपीतून डायलिसिस

सार्वजनिक-खाजगी सहभाग () मॉडेलअंतर्गत शहरात नव्या डायलिसिस केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. 2025 मध्ये 10 केंद्रांमधून 20 हजारांहून अधिक डायलिसिस सत्रे पार पडली. पुढील टप्प्यात सीटी-स्कॅन, एमआरआय, कॅथलॅब आणि रक्तपेढी सेवा खाजगी भागीदारीतून उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.

डीएनबी अभ्यासक्रमाला चालना

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रमाचा विस्तार करण्यात येत असून आतापर्यंत 107 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मालाड, बोरीवली, मुलुंड आणि वांद्रे येथील रुग्णालयांत नव्याने अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

------

संसर्गजन्य रोगांविरोधात मोहीम

एमडीआर क्षयरोगासाठी ‌‘बीपाल्म‌’ उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युल्यसिस यांच्या सहकार्याने मलेरिया व डेंग्यू नियंत्रणासाठी संशोधन सुरू आहे. ‌‘क्षयरोग मुक्त भारत‌’ अभियानांतर्गत 48 हँडहेल्ड एक्स-रे मशिनद्वारे 26,194 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

एचपीव्ही लसीकरणाचा प्रारंभ

केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाने 14 वर्षांच्या मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी पुढील वर्षापासून एचपीव्ही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. - पोर्टलद्वारे बालकांच्या लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी आणि अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध होणार आहे.

-----

‌‘फिट मुंबई‌’

जागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेवर आधारित ‌‘फिट मुंबई‌’ उपक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगासारख्या असंसर्गजन्य रोगांवर नियंत्रणासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

प्राथमिक आरोग्यसेवेला बळ

‌‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना‌’ उपक्रमातून 1.35 कोटी नागरिकांनी सेवा घेतली असून 33 पॉलीक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर्समधून 3.30 लाख नागरिकांना लाभ झाला आहे.

------

बेडच्या उपलब्धतेसाठी डॅशबोर्ड

रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसुतिगृहांमध्ये रुग्णशय्या उपलब्धतेचा केंद्रीकृतडॅशबोर्ड तयार करण्यात येत असून त्याबाबतची माहिती दररोज अद्ययावत करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना व प्रशासनाला रुग्णशय्या व्यवस्थापनेकरिता मोलाची मदत होणार आहे. त्यामुळे, कमीतकमी वेळेत रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे

आरोग्य सुविधा पीपीपी तत्त्वावर

2026-27 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन रक्तशुद्धीकरण केंद्रे, तीन दवाखाने, तसेच विविध रुग्णालयांमध्ये सी. टी. स्कॅन, एमआरआय, रक्तशुद्धीकरण केंद्र, कॅथलॅब, रक्तपेढी सुविधा आणि अतिदक्षता विभाग सार्वजनिक खासगी तत्त्वावर (पीपीपी) उपलब्ध करण्यात येणार आहेत.

------

नागरी सुविधा केंद्रांची उभारणी

रुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्नानगृह, शौचालय, यांत्रिक धुलाई सेवा अशा विविध मूलभूत सुविधा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत उपलब्ध करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे.

50 जेनेरिक मेडिकल सुरू

नागरिकांना परवडणारी व गुणवत्तापूर्ण नॉन-शेड्युल औषधे उपलब्ध करण्यासाठी शहरातील 50 निवडक ठिकाणी नॅकॉफच्या माध्यमातून जेनेरिक मेडिकल सुरू करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT