भाईंदर : राजू काळे
भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडणारा एकमेव भारतरत्न स्व. इंदिरा गांधी उड्डाणपूल अस्तित्वात आहे. त्याला पर्याय म्हणून मेट्रो मार्गाखाली बांधण्यात येत असलेल्या भाईंदर पूर्वेकडील दीपक हॉस्पिटल ते गोल्डन नेस्ट उड्डाणपुलाला जोडणारा व भाईंदर पश्चिमकडे जाणारा उड्डाणपूल साकारण्याच्या आशा एमएमआरडीएने मंगळवारी एक्सवर केलेल्या पोस्टमुळे पल्लवित झाल्या आहेत. हा प्रस्तावित उड्डाणपूल पुरेशा जागेअभावी सिंगल लेनचा असणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.
हा उड्डाणपूल मेट्रो मार्गाखालील दीपक हॉस्पिटल ते गोल्डन नेस्ट उड्डाणपुलाला जोडून तो येथील रेल्वे मार्गावरून (पूर्वाश्रमीचे भाईंदर फाटक) भाईंदर पश्चिमेला जोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या पुलाचे बांधकाम एमएमआरडीएच्या निधीतून करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे केली होती. त्याला तत्कालीन आयुक्तांनी 14 जून 2023 रोजी मंजुरी दिली. त्यावेळी आयुक्तांनी या प्रस्तावित उड्डाणपूलाची व्यवहार्यता तपासून निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. हा उड्डाणपूल सध्याच्या भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडणाऱ्या एकमेव भारतरत्न स्व. इंदिरा गांधी उड्डाणपुलावरील वाहतुकीला पर्याय ठरणार असल्याने तो महत्वाचा मानला जात आहे.
या उड्डाणपुलामुळे भविष्यात गांधी उड्डाणपुलावरील वाहतुकीचे नियोजन होऊन लोकांचा प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलाची निर्मिती झाल्यास गांधी उड्डाणपुलावरून उत्तनकडे जाणारी वाहतूक निर्गमित होईल तर पर्यायी तसेच प्रस्तावित उड्डाणपुलावरून भाईंदर पश्चिमेकडील वाहतूक निर्गमित होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलामुळे भाईंदर पश्चिमेकडील वाहतुकीचे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. तसेच इंधनाची बचत होऊन प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. याखेरीज हा उड्डाणपूल तयार झाल्यास काशिमीरा नाका ते भाईंदर पश्चिम दरम्यानची वाहतूक जलद होऊन सध्याच्या या प्रवासाला लागणारा सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ मोठ्याप्रमाणात कमी होऊन तो अवघ्या 7 ते 8 मिनिटांवर येणार आहे. मात्र, या उड्डाणपुलावरील वाहनांना भाईंदर पश्चिमेकडे मांदली तलाव येथे उतरण्यास पुरेशी जागाच नसल्याचा दावा त्यावेळी करण्यात आल्याने त्याचा व्यवहार्यता अहवाल तांत्रिक अडचणीत सापडला होता.
हा उड्डाणपूल साकारल्यास पुलावर दुतर्फा दोन पदरी ऐवजी एक पदरी मार्गच तयार करावा लागणार असल्याचा तसेच एखाद्या वाहनाला भाईंदर पश्चिमेकडे पुलावरून उतरल्यानंतर यू टर्न घेऊन जाण्यासाठी देखील पुरेशी जागा नसल्याचा दावा देखील करण्यात आला होता. या उड्डाणपुलाच्या बांधकामात पुरेशा जागेचा अडसर निर्माण झाल्याचा दावा केला जात असला तरी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले होते. यावरून या पुलाचे बांधकाम होणार की तो बासनात गुंडाळण्यात येणार, हे तूर्तास स्पष्ट होत असतानाच या उड्डाणपुलाखाली भाईंदर पूर्वेकडील महाराणा प्रताप सिंह व पश्चिमेकडील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रभावित होत असल्याने त्याला त्या-त्या समाजातील अनुयायांनी विरोध दर्शविला होता.
हे दोन्ही पुतळे इतरत्र स्थलांतरीत करण्यास देखील विरोध झाल्याने प्रस्तावित उड्डाणपुलाचे घोंगडे भिजत ठेवण्यात आले होते. तर हा उड्डाणपूल पश्चिम उपनगरासह ठाणे येथील कमी जागेतही बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांप्रमाणे बांधून भाईंदर पूर्व, पश्चिमेकडील वाहतुकीला पर्याय तसेच गती देण्याच्या उद्देशाने त्याचे बांधकाम करण्याची मागणी परिवहन मंत्र्यांनी एमएमआरडीएकडे रेटून धरली होती. त्याला यश आले असून एमएमआरडीएने प्रस्तावित भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडणारा पर्यायी उड्डाणपुल साकारण्याच्या आशा एमएमआरडीएने मंगळवारी एक्सवर केलेल्या पोस्टमुळे पल्लवित झाल्या आहेत.
हा उड्डाणपूल दुतर्फा सिंगल लेनचा असणार असून त्यानुसारच जुना पेट्रोल पंप ते गोल्डन नेस्ट दरम्यानच्या गोल्डन नेस्टकडील पुलाची उतरण बाजू सिंगल लेनची करण्यात आली आहे. तर जुना पेट्रोल पंप ते गांधी उड्डाणपूल दरम्यानच्या उड्डाणपुलावर चार लेनचा मार्ग करण्यात आला आहे. तसेच गोल्डन नेस्ट येथील सिंगल लेनला भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडणारा सिंगल लेनचा प्रस्तावित उड्डाणपूल जोडला जाणार आहे. यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा न येता त्याला गती मिळणार आहे.
भाईंदर पूर्व, पश्चिमेला जोडणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलामुळे दोन्हीकडील वाहतुकीला पर्याय उपलब्ध होणार आहे. या दोन्ही दिशांना ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांकरीता शहराच्या दक्षिण दिशेला एकमेव स्व. इंदिरा गांधी उड्डाणपूल अस्तित्वात आहे. तर उत्तरेला हलक्या वाहनांसाठी भुयारी वाहतूक मार्ग अस्तित्वात आहे. गांधी पुलावरील आपत्कालीन परिस्थितीत प्रस्तावित उड्डाणपूल महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा पूल ठाण्याच्या धर्तीवर बांधण्यात यावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक