मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे वॉर्ड क्रमांक 92 चे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगरातील एका गल्लीत घडली. या वेळी हाजी हे जखमी झाले असून त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फरार आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. हाजी कुरेशी हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 92 चे अधिकृत उमेदवार आहेत. बुधवारी सायंकाळी ते कार्यकर्त्यांसोबत परिसरात प्रचार रॅलीत सामिल झाले होते.
याच दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. उमेदवारावरच हल्ला झाल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राजकीय पूर्ववैमस्नातून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीवर रक्तरंजीत संघर्षाचे, हाणामारीचे सावट रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे (45) यांची 26 डिसेंबर रोजी 20 लाखांची सुपारी देऊन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी खालिद कुरेशी याला पुण्यातून अटक करण्यात आली. मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या राजकीय वैमनस्यातूनच करण्यात आली असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूरमध्ये प्रभाग 2 मधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची शुक्रवारी, 2 जानेवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याचा सुमारास डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने भीषण वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हिदायत पटेल यांच्यावर आकोट तालुक्यातील मोहाळा गावी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. आरोपीने पटेल यांच्यावर चाकूने पोटात आणि मानेवर दोन ते तीन वार केले. या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पटेल जागीच कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी आकोट पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. एका झुंडीने जलील यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यावेळी जलील गाडीमध्ये होते. यानंतर एमआयएमचे कार्यकर्ते, एमआयएममधील नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमावाला पांगवले. या सर्व प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा भागात काहीकाळ तणावाचे वातावरण होते.