

मुंबई : कांदिवलीतील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ओळखपत्राच्या नक्कल प्रतीसाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नियमांनुसार केवळ 50 रुपये शुल्क अपेक्षित असताना, महाविद्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
मुंबई विद्यापीठाने 6 ऑगस्ट 2018 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात ओळखपत्रासाठी नाममात्र शुल्क निश्चित केले असतानाही, कांदिवलीतील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने 7 जानेवारी 2026 रोजी स्वतंत्र परिपत्रक काढत ओळखपत्राची नक्कल प्रत मिळविण्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केला.
याशिवाय, वेळेत शुल्क न भरल्यास 500 ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, शिस्तभंग रोखण्यासाठी हे महाविद्यालयाकडून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. ओळखपत्राची नक्कल प्रत बनवून महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना आतमध्ये घेऊन येत आहेत. म्हणून हा निर्णय घेतला आहे.
सदर निर्णय विद्यार्थ्यांकडून जागा दंडात्मक रक्कम उकळण्यासाठी नसून, नियमांची अंमलबजावणी प्रभावी व्हावी यासाठी असल्याचे घेतला आहे. तक्रारदार संघटनेनेचे म्हणणे ऐकण्यासाठी उद्या महाविद्यालयात बोलवले आहे. त्यांनी याबाबत सविस्तर चर्चा महाविद्यालय प्रशासनाशी करावी, असेही सांगण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, विद्यापीठाच्या निर्देशांचे उल्लंघन करून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन’ (कॉप्स)चे अध्यक्ष अमर एकाड यांनी मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.