मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
साठी ओलांडलेले अजित पवार स्वतःच्या कर्तृत्वाच्या आधारावर राजकीय अवकाशात टेकऑफ करायला निघाले होते. फुटून बाहेर पडत स्थापलेला पक्ष स्थिरावला होता. विकासाचे क्षितिज त्यांना हाकारत होते, विचारधारा वेगवेगळी असली, तरी महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीने पाहायला तयार होते. त्यामुळेच जिल्हा परिषद निवडणुकांचे फड आटोपल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला योग्य ती गती देत प्रशासनात बदल करून नवे वातावरण निर्माण करायची त्यांची तयारी होती. मुख्यमंत्री कार्यालयात ‘पुढारी’चे चेअरमन आणि समूह संपादक योगेश जाधव यांच्यासमवेत झालेल्या भेटीत दादांनी मंगळवारीच त्यांच्या पक्षाच्या भविष्यातल्या वाटचालीचा पट उलगडून सांगितला होता. 2029 ची तयारी करायची आहे, पक्ष पहिल्या क्रमांकवर नेता आला, तर न्यायचा आहे हे निश्चित. तथापि, त्याआधी महाराष्ट्र बलशाली करायचेय ,असे दादा मिश्कील हसत सांगत होते.
दादांचे काका शरद पवार हे अत्यंत महत्त्वाचे राजकारणी. संपूर्ण देशभर त्यांच्या नावाचा डंका.अशा वृक्षाच्या छत्रछायेत राहून दादा वाढले. स्वतंत्र अस्तित्व दाखवायची संधी आता मिळाली होती. दादांना त्यांच्या कर्तृत्वाची चुणूक दाखवायला जो वेळ मिळाला तो बराच उशिरा. मात्र, विधानसभेच्या निकालांनी दिलेल्या यशानंतर दादा टेकऑफ करायचे मनसुबे रचत होते. त्यासाठी दादांनी तरुण चेहरे, उत्तम अधिकारी यांचे वर्तुळ स्वतःभोवती तयार केले होते. या वर्तुळाच्या आधारेच त्यांना राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान द्यायचे होते; पण नियतीच्या ते मनात नव्हते. अचानकपणे एखादा अपघात व्हावा आणि तो इतका चटका देऊन जावा हे केवळ दादांच्या नशिबी होते. नियतीने कर्तृत्व तर दिले होते. मात्र, ते सिद्ध करायचे संधीच दादांना मिळाली नव्हती. ती उशिराने का होईना मिळते आहे, असे वाटत असतानाच दादांची अपघाती एक्झिट झाली आहे. हे सगळेच अत्यंत करूण आणि हृदयद्रावक.
दादा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट जाणून होते. सहकारावर, ग्रामीण अर्थकारणावर, सेवा सोसायट्यांच्या मुलाधारावर दादांचे लक्ष असे. प्रचंड अभ्यास होता त्यांचा. पैसा कुठून येईल आणि तो कशा पद्धतीने खर्च करावा याबद्दल दादांच्या काही कल्पना होत्या. कार्यकर्त्यांना जपून ठेवण्याचा दादांचा स्वभाव होता. या स्वभावामुळेच आज दादांच्या असा अपघाती मृत्यू समोर येताच हजारो कार्यकर्ते ढसाढसा रडले. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा संकल्प, त्यांनी अशोक चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले त्यावेळीही उपमुख्यमंत्री या नात्याने प्रत्यक्षात आणण्याचा वसा स्वीकारला होता. मात्र, नियतीने त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा कर्णधार होण्याची किंवा स्टिअरिंग विल सांभाळण्याची जबाबदारी कधीच दिली नाही. केवळ 67 वर्षांचे दादा हे जग सोडून अनंतात विलीन झाले आहेत. दादांनी नागपूर अधिवेशनात एकदा पत्रकारांशी ते राजकारणात कसे आले बारामतीचे नेतृत्व त्यांच्या हाती कसं आलं, ते खासदार कसे झाले आणि त्यानंतर या दिल्लीच्या सत्तेत मन रमत नाही म्हणत महाराष्ट्रात पुन्हा डेरे दाखल होत सातत्याने आमदार म्हणून कसे निवडून आले हे सांगितले होते.
दादा गंमत करायचे. दादा पत्रकारांची दिलखुलासपणे बोलायचे. दादा मनातलं त्यांना सांगायचं असेल तरच कळू द्यायचे. मात्र, ठरवल्यानंतर कोणताही आडपडदा न बाळगता बोलायचे. सिंचन घोटाळ्याची वारंवार चर्चा सुरू झाली तेव्हा दादांनी आता मला अमुक नेतृत्वाच्या हाताखाली काम करायचे नाही हे पत्रकारांशी बोलताना नमूद केले होते. याबद्दलच्या बातम्या झळकल्या बरोबर दादांनी हो मी तसे बोललो; पण तुम्ही दाखवाल असे वाटले नव्हते असे म्हणत नाराजी व्यक्त केली. पण कोणत्याही पत्रकारावर डूक धरला नाही. दादा मोठे होते. दादांच्या मनातले महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न हे ग्रामीण अर्थकारणाला केंद्रभूत मानून लिहिले जायचे. अर्थसंकल्पात नवे काय करायचे याबद्दल दादांनी केवळ एक दिवसापूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. महसुली तूट भरून काढायची आणि विकासावरचे खर्च वाढवायचे असे त्यांचे स्वप्न होते.
दादा गेल्या काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने राजकारणात सकारात्मक भूमिका निभावत होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीतील आरोप-प्रत्यरोपांची प्रकरणे झाल्यानंतर निकालही लागले. आता पुन्हा एक येऊया म्हणून दादा दिलखुलासपणे मंत्रालयात वावरत होते. पायाभूत सुविधांसंबंधीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत दादा उत्तमपणे हास्यविनोद करत सामीलही झाले होते. जिल्हा परिषदांच्या प्रचाराला लागायचा मनोदय काल त्यांनी गप्पा मारताना जाहीरही केला होता. नियतीला त्यांचा हा निर्णय मान्य नव्हता. एक विमान आकाशाला गवसणी घालायला निघू पाहत होते. क्रूर नियतीने ते खाली उतरवले.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (दि. 24) रोजी कन्हेरी (ता. बारामती) येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ हा बारामतीतील अखेरचा कार्यक्रम ठरला.
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने 17 जानेवारी पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर दि. 24 रोजी बारामती दौऱ्यावर येत प्रचाराचा शुभारंभ केला होता.
कन्हेरीचा मारुतीराया हे पवार कुटुंबीयांचे श्रद्धास्थान. 1967 सालापासून पवार कुटुंबीय प्रत्येक निवडणुकीचा शुभारंभ मारुतीरायाला श्रीफळ फोडूनच करत आले आहे. पवार यांनी येथूनच शनिवारी तालुक्याच्या पुढील विकासाची दिशा स्पष्ट केली होती. ‘वाद टाळा, एकत्र या’ असे आवाहन त्यांनी या वेळी विरोधकांना केले होते.