

मुंबई : अजित पवारांची ओळख एक उत्तम प्रशासक आणि शिस्तप्रिय नेता म्हणून संबंध राज्याला आहे. राजकारणात असतानाही स्वतःवर काही बंधने घालून घेतानाच आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही हे गुण अंगी बाळगावेत, असा त्यांचा कायम आग्रह असायचा. त्यांच्या या गुणांची प्रचिती त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत दिसून आली आहे.
त्यांनी आपल्या राजकीय जीवनाचे धडे काका शरद पवारांकडूनच गिरवले. शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुण त्यांच्या सान्निध्यात राहून अजित पवारांनी आत्मसात केले. बारामती असो, पुणे असो की मुंबई अजित पवार शरद पवारांप्रमाणे सकाळी सहा वाजता तयार होऊन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य जनतेला भेटायला सज्ज असत. मुंबईत प्रदेश कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून दादा सर्वांना उपलब्ध असत. पक्ष कार्य आटोपल्यानंतर ते सकाळी दहा वाजण्याच्या ठोक्याला मंत्रालयातील आपल्या दालनात शासकीय बैठका आणि फायलींचा निपटारा करण्याचा सपाटा लावत.
अजित पवार यांचा दांडगा प्रशासकीय अनुभव, दरारा आणि अभ्यासू वृत्ती पाहता बैठकीला येताना अधिकारी अभ्यास करून, सर्व कागदपत्रे घेऊनच येत असत. दादा वेळेचे पक्के असल्याने आणि आपली वेळ चुकली, तर खरडपट्टी होईल, या भीतीने बैठकीचा कक्ष आधीच भरलेला असे. एखाद्या विषयातील त्रुटी दादा कधी काढतील, याची धास्ती अधिकाऱ्यांना कायम असायची. बैठक झाली आणि अजित पवारांनी चूक असल्यास अधिकाऱ्यांना फैलावर घेतले नाही, अशी एखादीच बैठक असेल. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत असत. कोरोना काळातही अजित पवार हे नियमित मंत्रालयात येऊन आढावा घेत प्रशासनाचा गाडा चालवत असत.
त्यांनी जवळपास अकरावेळा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना तो वस्तुनिष्ठ कसा ठरेल, लोकप्रिय घोषणा करण्याऐवजी आर्थिक शिस्त पाळण्यावर त्यांनी कायम भर दिला. प्रसंगी दरवाढ लागू करण्यासारखे कटू निर्णयही घेतले. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार होता. त्यामुळे राज्याच्या विकासाला पैसा कमी पडेल, अशी अजित पवारांची भूमिका होती. लाडकी बहीण योजना राबविल्याने राजकीय लाभ होईल हे दिसत असतानाही त्यांनी आपले परखड मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडले होते, असे अर्थ खात्याचे अधिकारी सांगतात.
एखाद्या कार्यक्रमाला गेले, तर त्यांना झालेले काम चांगले झाले आहे की नाही, याची ते पाहणी करत. त्यांना कामात हलगर्जी दिसला, तर ते अधिकाऱ्यांना सुनावत. आपल्या कार्यालयात एखादा कागदाचा तुकडा पडला, एखाद्या भिंतीचा किंवा पडद्याचा रंग भडक झाला, तरी तो त्यांच्या नजरेला खटकत असे.