

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनंतर आता सोशल मीडियावर एका ज्योतिषाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये २०२६ मध्ये भारतात विमान अपघात होणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली होती. या व्हिडिओचा संबंध आता थेट अजित पवारांच्या अपघाताशी जोडला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणारी एक व्यक्ती भारतातील संभाव्य विमान अपघाताबाबत बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ते म्हणतत, ‘‘भारतात फेब्रुवारी आणि मार्चच्या सुमारास विमान अपघात होईल, हे तुम्ही लिहून ठेवा. मी ही भविष्यवाणी करत आहे आणि ती खरी ठरेल. सावध करणे हे माझे काम आहे, आता ते रोखणे तुमच्या हातात आहे.’’ हा व्हिडिओ २ जानेवारीच्या सुमारासचा असल्याचे सांगितले जात असून, अजित पवारांच्या निधनाच्या बरोबर २५ दिवस आधी ही भविष्यवाणी करण्यात आली होती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
'astrologerankittyagiofficial' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, ‘‘ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली,’’ तर दुसऱ्याने ‘‘भविष्यवेत्त्यांना हलक्यात घेऊ नका,’’ असे म्हटले आहे. अनेकांनी याला केवळ एक योगायोग मानले आहे, तर काही जण याला नियतीचा खेळ मानताना दिसत आहेत.
ज्योतिषी अंकित त्यागी यांनी वर्तवलेली भविष्यवाणी ही सर्वसाधारणपणे ‘‘भारतातील विमान अपघाता’’बाबत होती, त्यात अजित पवारांचा उल्लेख नव्हता. तरीही, घटना आणि वेळेचा योगायोग पाहता लोक याचा संबंध या अपघाताशी जोडत आहेत. अपघाताचा सविस्तर तपास अहवाल आल्यानंतरच मूळ कारण स्पष्ट होईल, मात्र सध्या तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
बुधवार, २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत क्लेशदायक ठरला. मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानाला (Learjet 45) लँडिंगदरम्यान अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताची दाहकता इतकी प्रचंड होती की, अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख केवळ त्यांच्या हातातील घड्याळावरून पटली. डीजीसीएने या दुर्घटनेला दुजोरा दिला असून खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाड हे प्राथमिक कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.