मराठवाडा

उस्मानाबाद : पाण्यात उडी घेऊन सेवानिवृत्त उपसंचालक, शिक्षकाने दिले ‘मायलेका’ला जीवदान

अविनाश सुतार

कळंब; परमेश्वर पालकर : शेततळ्यात बुडणाऱ्या १० वर्षीय मुलाला आणि त्याच्या आईला पाण्यात उडी मारून बाहेर काढले. त्यांना जीवदान देण्यासाठी क्रीडा व युवक संचालनालयाचे सेवानिवृत्त उपसंचालक जनक टेकाळे (वय ६२) आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील जनता विद्यालयातील सहशिक्षक राजकुमार तटाळे देवदूतासारखे धावून आले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मायलेकाचा जीव वाचला. त्या दोघांच्या  या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि.८) सायंकाळी ५ ते ५:३० च्या दरम्यान कळंब तालुक्यातील बोरगाव (समुद्रे ) येथील भारतमाता मंदिर शेजारील शेतात दोन शेतमजूर महिला काम करत होत्या. त्यांची ३ लहान मुले मंदिर परिसरात खेळत होती. खेळता खेळता ती मुले शेजारच्या शेतातील शेततळ्याकडे मासे पाहण्यासाठी गेली. यावेळी त्यातील सोहम राजाभाऊ जगधने (वय १०) हा मुलगा पाय घसरून पाण्यात पडला. तळे खोल असल्याने ‌तो बुडू लागला.

तेव्हा दुसऱ्या मुलांनी पळत जाऊन काही अंतरावर असलेल्या महिलांना आवाज दिला. त्या दोघी पळतच शेततळ्याकडे आल्या. बुडणाऱ्या मुलाची आई शितल राजाभाऊ जगधने हिने मागे पुढे न बघता पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तिलाही पोहता येत नसल्याने तीही बुडू लागली. दरम्यान, क्रीडा व युवक संचालनालयाचे सेवानिवृत्त उपसंचालक जनक टेकाळे  (वय ६२) व जनता विद्यालयातील सहशिक्षक राजकुमार तटाळे (दोघेही रा, पाडोळी, ता. कळंब) मंदिरा‌शेजारी गप्पा मारत बसले होते. या दोघांना दुसऱ्या महिलेने मोठ्याने आवाज देऊन शेततळ्याकडे बोलावून घेतले. तेव्हा दोघांनीही ‌क्षणाचाही विलंब न करता शेततळ्याच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत मुलगा बुडून तळाला गेला होता‌.

दोघांनीही ‌पाण्यात उडी घेऊन प्रथम बुडणाऱ्या महिलेस बाहेर काढले. नंतर बुडालेल्या‌‌ मुलाचा शोध घेऊ ‌लागले. मात्र पाणी अतिशय हिरवेगार व शेवाळलेले असल्याने मुलगा सापडत नव्हता. थोड्या वेळाने बुडणारा मुलगा तटाळे यांच्या‌ पायाला लागला. ‌त्यानंतर त्यांनी पाण्यात बुडी घेऊन त्यास बाहेर‌‌ काढले. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने मुलाची श्वसन क्रिया बंद‌ पडू लागली होती. तेव्हा तटाळे यांनी बाहेर येऊन मुलास शास्त्रीय पद्धतीने प्रथमोपचार करण्यास सुरुवात केली.

प्रथम पालथे टाकून एक ते दोन‌ मिनिटे पंपिंग व दाब देत पाणी काढण्याचा प्रयत्न केला. अगदी थोडेसेच‌ पाणी बाहेर आले. दरम्यान‌, मुलाचा आवाज आल्याने त्यास सरळ उताणे झोपवून  छातीवर दोन ते तीन मिनिटे पंपिंग केले. आश्चर्य म्हणजे मुलाने मोठा श्वास घेतला. नंतर‌ मुलाने ‌अर्धवट झाकलेले डोळे पूर्णपणे उघडले. तटाळे यांनी मुलाच्या छातीची धडधड ऐकली आणि‌ इतरांना मुलाचे तळहात व तळपायावर घर्षण करण्यास सांगितले. काही वेळाने मुलाने ‌उलटी केली‌. व त्यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. आश्चर्य म्हणजे तो‌ मुलगा चालत पायी गेल्याने‌ उपस्थित सर्वांनाच आनंदाचा सुखद ‌धक्काच बसला.

मोठ्या पदावर काम केलेले टेकाळे आणि सहशिक्षक तटाळे यांनी प्रसंगावधान राखत दोन जीव वाचविले. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT