खेलो इंडिया यूथ गेम्स : 20 सेकंदात बाजी पालटली आणि….. गोल्ड मेडल महाराष्ट्राच्या खात्यात ! | पुढारी

खेलो इंडिया यूथ गेम्स : 20 सेकंदात बाजी पालटली आणि..... गोल्ड मेडल महाराष्ट्राच्या खात्यात !

पंचकुला : (क्रीडा प्रतिनिधी):  खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या खो-खो संघांनी सुवर्णपदके पटकावून भांगडा केला. दोन्ही संघांनी सर्वसाधारण विजेतेपदक पटकावले. अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघांचा पराभव केला. त्यांना उपविजेतेपदासह रौप्यपदक मिळाले. मुलींमध्ये तिसऱ्या स्थानावर पंजाब व पश्चिम बंगाल राहिला. मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळाले.

स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदके पटकावून मान उंचावली. मुलींचा अंतिम सामना ओरिसासोबत झाला. अत्यंत उत्कंष्ठावर्धक झालेला सामना महाराष्ट्राने (८-६, ७-९, ६-५ ः २१ विरूद्ध २०) एक गुणाने जिंकला. ओरिसाने सुरूवातीपासून महाराष्ट्राला चांगली लढत दिली. पहिल्या डावात महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण करताना ८ गडी बाद केले. ओरिसाचे पहिले तीन गडी टिपण्यात थोडी ढिलाई झाली.

मतदान अवैध ठरवण्याच्या आदेशाला आमदार सुहास कांदे यांच्याकडून आव्हान; 15 तारखेला हायकोर्टात सुनावणी

ओरिसाचे आक्रमण थोडे बचावात्मक होते. त्यांना महाराष्ट्राचे केवळ सहा गडी टिपता आले. पहिल्या डावात महाराष्ट्राला दोन गुणांची आघाडी मिळाली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावात अतिक्रमण करताना शर्थीचे प्रयत्न केले. परंतु सावध झालेल्या ओरिसाचे केवळ सात गडी गारद करता आले. त्यांच्या मुलींनी चांगला बचाव केला.

पुन्हा ओरिसाच्या आक्रमणापुढे महाराष्ट्राची संरक्षणात पुन्हा थोडी ढिलाई झाली. ओरिसाने अतिक्रमण तीव्र केल्याने आपले ९ गडी त्यांच्या हाती सापडले. पहिल्या डावात आघाडी असूनही ओरिसाने दुसऱ्या डावात स्कोर बरोबरीत आणला. त्यामुळे पुन्हा एक्स्ट्रा इनिंग खेळावी लागली. महाराष्ट्राने तिसऱ्या डावात आक्रमणाची धार कायम ठेवत त्यांचे सहा गडी बाद केले. संरक्षण करताना पाच गडी गमावले. परिणामी महाराष्ट्र एक गुणाने विजयी झाला.

शेवटच्या २० सेकंदात सुवर्ण
ओरिसाने जास्तीच्या डावात पाच गडी बाद करून चुरस निर्माण केली होती. सामना संपण्यासाठी एक मिनिट बाकी असताना श्रेया पाटीलने नाबाद खेळी केली. अगदी २० सेकंद उरली असताना अटीतटीचा प्रसंग ओढावला होता. परंतु तिने उत्कृष्टपणे नाबाद खेळी करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. व्यवस्थापक सुधीर चपळगावकर, चीफ कोच राजेंद्र साप्ते, प्रशांत पवार, सत्येन जाधव यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

यांची चमकदार खेळी
प्रीती काळेने १ मिनिट ४५ व २ मिनिट ४० पळतीचा खेळ करीत २ गडीही बाद केले. संपदा मोरेने दोनदा दीड मिनिट व एक मिनिट दहा सेकंद बचाव केला. त्यानंतर सहा गडी बाद करून विजयात मोठा वाटा उचलला. कौशल्या पवार १.५०, १.४०, १.३० पळती व २ गडी बाद केले. जान्हवी पेठे – १.३५, १.३०, २.१०, श्रेया पाटील – १.१०, १.१० व तीन गडी टिपले. वृषाली भोये ४ गडी बाद करून सामना फिरवला. गौरी शिंदे २ गडी तंबूत धाडले. दीपाली राठोडने एक मिनिट पळतीचा खेळ करीत २ गडी टिपले. ओरिसाकडून अर्चना मांझी १.४५, २.१५ व अनया दास १.१५, १.३० पळती केली. समरविका साहूने महाराष्ट्राचे सात गडी बाद केले.

महाराष्ट्राचा जल्लोष
दोन्ही संघांनी विजय मिळवल्याने जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष झाला. त्यानंतर महाराष्ट्राने आणलेल्या ढोलाच्या तालावर महाराष्ट्राने भांगडा केला. त्यात ओरिसा आणि पश्चिम बंगालमधील खेळाडू सहभागी झाले. त्यामुळे विजयी माहोल बनला. महाराष्ट्राचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील यांच्यासह सर्वच प्रशिक्षकांनी नृत्य करीत जल्लोष केला.

Back to top button