Supriya Sule 
मराठवाडा

Supriya Sule : केंद्र सरकारने ८ वर्षात महागाईचे गिफ्ट दिले : सुप्रिया सुळे

अविनाश सुतार

परभणी, पुढारी वृत्तसेवा : केंद्रात ८ वर्षांपूर्वी आलेल्या सरकारने सर्वसामान्यांना मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र, आज रिअ‍ॅलिटी काही वेगळीच आहे. सर्वसामान्यांना केवळ महागाईचे गिफ्ट देण्याचेच काम या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे  (Supriya Sule) यांनी शुक्रवारी (दि.२७) येथे पत्रकार परिषदेत केली. घरी जावून पत्नीला विचारा, केंद्र सरकारने काय दिले. तीच सांगू शकेल, अशीही मार्मिक टिप्पणी खासदार सुळे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त परभणीत दाखल झालेल्या सुळे  (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या उपक्रमाची माहिती देताना आगामी काळात दिव्यांगांचे संपूर्ण विषय सोडविण्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा भर राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांना ५ टक्के निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, येत्या दोन वर्षांत कर्णबधिरांसाठी राज्य पातळीवर उपक्रम राबवून जन्मतः बालकांचे टेस्टींग करून त्यांच्यावर लगेचच उपचार केले जाणार आहेत.

भोंग्यांच्या प्रश्‍नावर बोलताना कुठला भोंगा उतरला, असा उलट सवाल करीत भोंग्यांचे आंदोलन अगदीच गाव पातळीवरच्या काल्याच्या कार्यक्रमावरही चुकीचा परिणाम करणारे ठरले आहे, असेही त्या म्हणाल्या. ओबीसी आरक्षणात मध्यप्रदेशमध्ये न्यायालयाने दिलेला निकाल १०० टक्के नाही. त्यामुळे महाराष्ट्राची व मध्यप्रदेशची तुलना करता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारच्या गहू निर्यातीच्या संदर्भात या सरकारचे धोरण रात्रीतून बदलते. याचा प्रत्यय आला आहे. गव्हाच्या निर्यातीला प्राधान्य देणार्‍या सरकारने रात्रीतून यु टर्न घेत दुसर्‍याच दिवशी निर्यात बंदी केली. त्याचबरोबर सोशल सेक्टरवर केंद्र सरकारचे बजेट वाढत आहे. त्याचवेळी शिक्षणासह अन्य महत्वांच्या बाबींवर निधीची तरतूद केली जात नाही. एकूणच सरकारची धोरणे चुकीची आहेत, असेही सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : नवाब मलिकांवर अन्याय

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे आर्यन खान प्रकरणात सातत्याने लढत राहिले. सत्याची बाजू घेत ते बोलत होते. त्यामुळेच आज आर्यन खानला क्‍लिन चीट मिळाल्याने सत्यमेव जयतेचा प्रत्यय आला आहे. नवाब मलिक यांनी या प्रकरणात सातत्याने उच्चारलेला फर्जीवाडा हा शब्द लागू झाला आहे. पण, दुर्देवाने नवाब मलिकांवरच अन्याय झाला आहे, अशी खंतही सुळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT