

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
Monsoon Update : मान्सून पुढे सरकरण्यासाठी अनुकूल स्थिती असून पुढील २-३ दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही अधिक भागात आणि लक्षद्वीपच्या काही भागांतून पुढे सरकला आहे. गेल्या २४ तासांत केरळ किनारपट्टी आणि आग्नेय अरबी समुद्रावर ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामनी यांनी दिली आहे.
पावसामुळे भारतातील बहुतांश भागातील तापमान सामान्य आणि सामान्यपेक्षा कमी झाले आहे. पुढील ५ दिवसांत उष्णतेची लाट राहणार नाही. पश्चिम हिमालयीन भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे आणि त्यामुळे तेथे पाऊस पडेल. दिल्लीत पुढील २ दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
म्यानमारजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनची गती (Monsoon Update) मंदावली होती. पण आता तो पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अंदमानात १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचा वेग कमी होता. २२ मे रोजी तो लक्षद्वीपजवळ पोहोचला होता. आता त्याने केरळच्या दिशेने आगेकूच केली आहे.