BANvsSL Test : श्रीलंकेचा बांग्लादेशवर 10 विकेट्सने विजय, मालिका 1-0 ने जिंकली | पुढारी

BANvsSL Test : श्रीलंकेचा बांग्लादेशवर 10 विकेट्सने विजय, मालिका 1-0 ने जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : असिथा फर्नांडोची (10 विकेट) उत्कृष्ट गोलंदाजी आणि अँजेलो मॅथ्यूज (नाबाद 145) दिनेश चंडीमल (124 धावा) यांच्या शानदार शतकाच्या जोरावर श्रीलंकेने ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला. बांगलादेशने श्रीलंकेसमोर विजयासाठी 29 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते ओशादा फर्नांडो (नाबाद 21) आणि कर्णधार दिमुथ करुणारत्ने (नाबाद 7) यांनी तीन षटकांतच पूर्ण केले. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली आहे. (BANvsSL Test)

सामनावीर ठरलेल्या असिथाने 141 धावांत 10 बळी घेतले. ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. दोन शतकांच्या बळावर एकूण 344 धावा केल्याबद्दल मॅथ्यूजला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने मुशफिकुर रहीम (नाबाद 175) आणि लिटन दास (141 धावा) यांच्या शतकांच्या जोरावर 365 धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने मॅथ्यूज आणि चंडीमलच्या शतकांच्या जोरावर 506 धावांची मजल मारली आणि 141 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. (BANvsSL Test)

त्यानंतर बांगलादेशचा संघ सामन्याच्या शेवटच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात 4 बाद 34 धावांवर खेळायला उतरला. पण असिथाच्या शानदार गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 169 धावांत गारद झाला. लिटन दास (52 धावा) आणि शकीब अल हसन (58) यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि सहाव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. एकवेळ बांगलादेशची धावसंख्या 5 गडी बाद 156 अशी होती. मात्र संघाच्या शेवटच्या 5 विकेट अवघ्या 13 धावांत पडल्या. अखेर श्रीलंकेला विजयासाठी 29 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 3 षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. (BANvsSL Test)

या विजयाच्या जोरावर श्रीलंकेला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये फायदा झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानला मागे टाकत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पॉइंट टेबलमध्ये श्रीलंकेचे 55.56 टक्के गुण आहेत. ऑस्ट्रेलिया 75 टक्के गुणांसह पहिल्या, दक्षिण आफ्रिका 71.43 गुणांसह दुसऱ्या आणि भारत 58.33 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो तर त्यांचे 52.38 टक्के गुण आहेत. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड सहाव्या तर वेस्ट इंडिज सातव्या स्थानावर आहे.

Back to top button