मातोरी गावात दगडफेकीची घटना  Pudhari News Network
बीड

Manoj Jarange : जरांगे यांच्या मातोरी गावात दगडफेक

पुढारी वृत्तसेवा

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या अभिवादन दौऱ्याला जात असलेल्या रॅलीवर मनोज जरांगे यांची जन्मभूमी मातोरी गावात गुरुवारी रात्री दगडफेक झाली. यात सात ते आठ जण जखमी, तर पाच ते सात मोटारसायकलींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

लक्ष्मण हाके सध्या बीड जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा भगवान गडावर अभिवादन दौरा आणि मुक्काम होता. या दौऱ्याचे स्वागत करण्यासाठी भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या माळेगाव, घोगस पारगाव येथील दीडशे ते दोनशे कार्यकत्यांनी मोटारसायकल रॅली काढली होती. कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरून गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीकडे जात असताना मनोज जरांगे यांच्या मातोरी गावामध्ये ही रॅली थांबली. तेथे डीजेवर गाणे वाजवण्यात आले, यावरून दोन गटांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जाते. या वादाचे पर्यवसान दगडफेकीत झाले. यात सुमारे पाच ते सात मोटरसायकलींची तोडफोड करण्यात आल्याचे समजते. या वेळी दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी झाली. त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.

दरम्यान, मातोरी गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिरूर आणि चकलांबा येथील पोलिस पथकांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारानंतर मातोरीजवळ असणाऱ्या बोरगाव फाटा येथे एक ते दीड हजारावर लोक एकत्र झाले असल्याचे समजते. माळेगाव चकला येथील काही मंडळींनी मातोरी येथे कृष्णनगर भागात रात्री दगडफेक केली. त्यास कृष्णनगर भागातील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे समाजकंटक पळून गेले.

जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे मातोरीत तळ ठोकून असून, विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना हे मातोरीत दाखल झाल्याचे सांगण्यात आले. या भागातून प्रा. हाके यांची रॅली जाणार असल्याने ओबीसी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर थांबले होते. रात्री बारा वाजेपर्यंत लोक हाके यांची प्रतिक्षा करीत होते. दोन्ही समाजबांधवांनी शांतता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हाकेंसाठी लोक रस्त्यावर

या भागातून प्रा. हाके यांची रॅली जाणार असल्याने ओबीसी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर थांबले होते. मध्यरात्रीपर्यंत लोक हाके यांची प्रतीक्षा करीत होते. अफवांचे पेव दगडफेकीच्या घटनेनंतर आसपासच्या गावांमध्ये अफवांचे पेव फुटले. त्यामुळे गेवराई, शिरूर तालुक्यातील शेकडो लोक मातोरीच्या दिशेने निघाले. पोलिसांनी गस्त कायम आहे.

बीड जिल्ह्यात तणाव

लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाजात तणाव निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर प्रा. हाके यांचा अभिवादन दौरा सुरू झाला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट समाजमाध्यमांवर करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये बंद पाळण्यात आला होता. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख खांडे यांनी बजरंग सोनवणे यांना मदत केल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या घरावर गुरुवारीच हल्ला करण्यात आला होता. या घटनांमुळे जिल्ह्यात निवडणुकीदरम्यान निर्माण झालेला तणाव अजूनही मातोरी गावात गुरुवारी रात्री झालेल्या दगडफेकीत दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. गावात दगडांचा खच पडला आहे.

विधिमंडळात पडसाद उमटणार

राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारीच सुरू झाले असून, शुक्रवारी त्यात या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT