गयाना : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील दुसर्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. सातत्याने पावसाचाच व्यत्यय आलेल्या या उपांत्य लढतीत भारताने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्या फटकेबाजीमुळे निर्धारित 20 षटकांत 7 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली व प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 16.4 षटकांत अवघ्या 103 धावांमध्येच गुंडाळला. अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. विजयासाठी 172 धावांचे आव्हान असताना कर्णधार जोस बटलर व फिल सॉल्ट यांनी 3 षटकांत 26 धावांची जोरदार सलामी दिली. मात्र, चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने बटलरला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला आणि तेथूनच हा सामना इंग्लंडच्या हातातून निसटला. बटलरने 15 चेंडूंत 4 चौकारांसह 23 धावा जमवत जोरदार सुरुवात केली. मात्र, त्याचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसला आणि त्याला तंबूत परतावे लागले.
बटलर बाद झाल्यानंतर सॉल्ट (5), मोईन अली (8), बेअरस्टो (0), सॅम कुरेन (2), ख्रिस जॉर्डन (1) ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि याचा इंग्लंडला या लढतीत मोठा फटका बसला. प्रारंभी, रोहित शर्मा (39 चेंडूंत 57), सूर्यकुमार यादव (36 चेंडूंत 47), हार्दिक पंड्या (13 चेंडूंत 23) यांच्या फटकेबाजीमुळे भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकांत 7 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली होती. इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डन 3 षटकांत 37 धावांत 3 बळींसह सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. याशिवाय, रशिद, आर्चर, टोपली व कुरेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला होता.
सलामीवीर रोहित शर्माने या लढतीत 36 चेंडूंत अर्धशतक साजरे करताना खराब चेंडूंवर फटकेबाजी करण्यावर भर दिला. पहिल्या 8 षटकांदरम्यान मात्र खेळपट्टी सर्द असल्याने व चेंडू सरळ बॅटवर येत नसल्याने याचा भारताच्या धावगतीवर विपरीत परिणाम झाला. इंग्लंडने येथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण पसंत का केले, याची पोचपावती भारताच्या पहिल्या 8 षटकांच्या खेळातच मिळाली होती.
रोहित शर्माने आपल्या डावादरम्यान टी-20 विश्वचषकात षटकारांचे अर्धशतक साजरे केले. मात्र, नंतर तो लवकरच बाद झाल्याने भारताला आणखी एक धक्का बसला. डावातील 14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर आदिल रशिदने एका अप्रतिम गुगलीवर रोहितचा त्रिफळा उडवत त्याची खेळी संपुष्टात आणली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार्या अष्टपैलू हार्दिक पंड्यासमोर आक्रमक फलंदाजीवर भर देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने आर्चरला चौकार खेचत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. मात्र, दुसर्या बाजूने ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने बचावावर भर देणेही तितकेच महत्त्वाचे होते.
यादरम्यान, सूर्यकुमारला विशेषत: लिव्हिंगस्टोनने बरेच जखडून ठेवले होते. अखेर ही कोंडी फोडण्याच्या प्रयत्नात आर्चरने टाकलेल्या 16 व्या षटकातील एका स्लोअर वनवर सूर्यकुमार अलगद जाळ्यात अडकला आणि 47 धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. आऊटसाईड ऑफ स्टम्पवरील चेंडूवर सूर्यकुमारने उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी अपयशी ठरला. लाँगऑनवरील जॉर्डनने यावेळी सोपा झेल टिपला. सूर्यकुमार बाद झाला, त्यावेळी भारताची 15.4 षटकांत 4 बाद 124 अशी स्थिती होती.
डावखुरा रवींद्र जडेजा सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरला, त्यावेळीही चेंडू सरळ बॅटवर येत नव्हता. हार्दिक पंड्याने जॉर्डनला सलग दोन षटकारांसाठी भिरकावून देत ही कोंडी फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, नंतर याच प्रयत्नात त्याने करणकडे सोपा झेल दिला होता. शिवम दुबे येथे गोल्डन डकवर बाद झाल्याने भारताला आणखी एक धक्का बसला. अक्षर पटेलने 6 चेंडूंत 10 धावा केल्या तर जडेजा 9 चेंडूंत 17 धावांवर नाबाद राहिला.
विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर ऋषभ पंत तिसर्या स्थानी फलंदाजीला उतरला. लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनवर भर देण्याच्या रणनीतीनुसार, हा निर्णय घेण्यात आला. पण, ऋषभ पंतही आल्या पावली परतल्याने भारताचा हा निर्णयही अपेक्षेला खरा उतरला नाही. पंतने सॅम कुरेनला फ्लिक करण्याच्या प्रयत्नात बेअरस्टोकडे सोपा झेल देत ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला.
टी-20 क्रिकेटमधील पहिली 6 षटके पॉवर प्लेची असल्याने सर्कलबाहेर तीनच खेळाडू तैनात करण्याची मुभा असते व याचा लाभ घेत या पहिल्या 6 षटकांत धावांची शक्य तितकी आतषबाजी केली जाणे अपेक्षित असते. मात्र, भारताच्या डावात प्रथम विराट कोहली व नंतर ऋषभ पंत अतिशय स्वस्तात बाद झाले आणि यामुळे या 6 षटकांमध्ये धावांची आतषबाजी करण्याऐवजी भारताला बचावात्मक पवित्र्यावर अधिक भर द्यावा लागला. याचा परिणाम धावगतीवर झाला. या लढतीत 6 षटकांअखेर भारताला 2 बाद 46 धावांवर समाधान मानावे लागले होते.
8 षटकांत 2 बाद 65 धावांवर खेळ थांबवावा लागला, तोवर रोहित व सूर्यकुमार या दोन्ही फलंदाजांना अद्याप पूर्ण सूर सापडलेला नव्हता. या ब्रेकनंतर पुन्हा खेळ सुरू केला गेला, त्यावेळी मात्र या उभय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. एकीकडे, रोहितने जवळपास प्रत्येक चेंडूवर फटकेबाजीचा प्रयत्न केला तर सूर्यकुमार यादवनेही धावफलक हलता राहील, याकडे काटेकोर लक्ष दिले. मात्र, याचवेळी सेट झालेला रोहित शर्मा बाद झाला आणि भारताला आणखी एक धक्का सोसावा लागला होता.
गयानात ठरावीक अंतराने संततधारेचा व्यत्यय येत राहिल्याने यामुळे प्रारंभी नाणेफेकीला उशीर झाला आणि त्यानंतर पहिली 8 षटके पूर्ण होत असताना दोनवेळा खेळ थांबवणे भाग पडले होते. खेळात दुसर्यांदा पावसाचा व्यत्यय आला, त्यावेळी भारताने 8 षटकांत 2 बाद 65 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी सलामीवीर रोहित शर्मा 26 चेंडूंत 37 तर सूर्यकुमार यादव 7 चेंडूंत 13 धावांवर नाबाद होते.
विजयासाठी 172 धावांचे आव्हान असताना इंग्लिश सलामीवीर फ्लाईंग स्टार्टसाठी प्रयत्नशील असतील, हे साहजिकच होते. त्यादृष्टीने त्यांनी आक्रमक सुरुवातही केली होती. मात्र, अक्षर पटेलने डावातील तिसर्या, पाचव्या व सातव्या षटकात प्रत्येकी एक गडी बाद केला आणि इथेच या सामन्याचा नूरच पालटला. अक्षरने तिसर्या षटकातील पहिल्या चेंडूवर बटलरला पंतकरवी झेलबाद केले, पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला त्रिफळचीत केले तर सातव्या षटकात देखील पहिल्याच चेंडूवर मोईन अलीला पंतकरवी यष्टिचीत करत इंग्लंडला सातत्याने धक्के दिले. हाच या लढतीचा टर्निंग पॉईंटही ठरला.