Legislative Council candidacy to Pankaja Munde  : Fireworks display by activists
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी : 'यश:श्री' वर गुलालाची उधळण  Pudhari Photo
बीड

पंकजा मुंडेंना विधानपरिषद उमेदवारी : 'यश:श्री' वर उधळला गुलाल, परळीत फटाके फोडून आनंदोत्सव

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या व बीड लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार अशी मोठी चर्चा होती. यातच आज भाजपाने विधान परिषदेसाठीच्या पाच जागांमध्ये पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित केली. उमेदवारी घोषित होताच परळीतील त्यांच्या 'यश:श्री' या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला व शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून 5 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. विधानपरिषदेच्या जागेसाठी पंकजा मुंडेंनाही संधी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांची चर्चा सुरू होती. त्यामध्ये, लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. बीडमधील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांचा भाजपच्या आज जाहीर करण्यात यादीत समावेश आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वीच विधानपरिषदेत संधीत देऊन जातीय समीकरणं जुळवण्याचं काम भाजपकडून करण्यात आले आहे. त्यामुळे, गेल्या 5 वर्षांपासून राजकीय पुनर्वसनासाठी प्रतिक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. तर, सातत्याने नाराजी दर्शवणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांना गुलाल उधळण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित होताच परळी येथे कार्यकर्त्यांनी मोठा आनंद उत्सव साजरा केल्याचे बघायला मिळाले. पंकजा मुंडे यांच्या यश:श्री या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी करत गुलाल उधळला. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, राणी लक्ष्मीबाई टॉवर या मुख्य चौकातही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयाच्या घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून व पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा केला आहे.

मंत्रीपद मिळणार?

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे सारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयावरही आनंदोत्सव

दरम्यान, पंकजा मुंडे यांची विधानपरिषद उमेदवारी घोषित झाल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे संपर्क कार्यालय असलेल्या जगमित्र कार्यालयासमोर न.प. गटनेते वाल्मीक कराड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जमा होत फटाक्यांची आतिषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवून या उमेदवारीचा आनंदोत्सव साजरा केला.

SCROLL FOR NEXT