बीड

Beed accident | काळ आला होता पण वेळ आली नव्हती !कानिफनाथ घाटात ट्रॅव्हल पलटी; ३० प्रवासी सुखरूप

पहाटेच्या अंधारात घडला अपघात; ग्रामस्थ आणि पोलिसांची तातडीचे मदतकार्य

पुढारी वृत्तसेवा

कडा : पहाटेच्या शांततेला चिरत अहिल्यानगर बीड राज्य महामार्गावर आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथील कानिफनाथ घाटात शनिवारी भीषण अपघात घडला. पुण्यावरून नांदेडकडे निघालेली प्रवाशांनी भरलेली खासगी ट्रॅव्हल्स अचानक पलटी झाल्याने काही काळ मृत्यूचे सावट निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने बसमधील सर्व ३० प्रवासी सुरक्षित बचावल्याने मोठी दुर्घटना टळली.

आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट परिसरातील कानिफनाथ घाटात शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. पाटोदा येथील नूर ट्रॅव्हल्स (एमएच-२९ एम-८३९७) ही बस पुण्याहून नांदेडकडे जात असताना घाटातील तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव वेगामुळे बस रस्त्यावरच पलटी झाली. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते.अचानक बस पलटी झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बसमधून आरडाओरडा सुरू झाला.

मात्र,अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले.किरकोळ जखमी झालेल्या काही प्रवाशांवर उपचारासाठी अहिल्यानगर येथे पाठविण्यात आले. अपघातानंतर प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली.तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मृत्यू समोर दिसला, पण नशीब साथ देऊन गेले

घाटातील वळणावर बस पलटी झाल्यानंतर काही क्षण प्रवाशांना काय घडले हेच समजले नाही. बसचा वेग आणि अपघाताची तीव्रता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, प्रवाशांचे नशीब बलवत्तर ठरल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून सर्वजण सुरक्षित बचावले.

अंभोरा पोलिस ठरले देवदूत

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद ठरली. जखमींना त्वरित मदत,प्रवाशांची सुरक्षित सुटका आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

धोकादायक घाटरस्त्याची पुन्हा चर्चा

कानिफनाथ घाटातील तीव्र वळणे आणि उतार यामुळे हा मार्ग आधीपासूनच अपघातप्रवण मानला जातो. शनिवारी झालेल्या घटनेने पुन्हा एकदा घाटरस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

"देव तारी त्याला कोण मारी..."

कानिफनाथ घाटातील या अपघातात बस पलटी होऊनही सर्व ३० प्रवासी सुरक्षित राहिले. अपघाताची तीव्रता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र, प्रवाशांचे नशीब आणि पोलिस-ग्रामस्थांची वेळेवर मिळालेली मदत यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.हा प्रसंग घाटरस्त्यांवरील वेग आणि निष्काळजीपणाचे धोके अधोरेखित करणारा ठरला आहे.

खासगी ट्रॅव्हल्सवर नेमके कोणाचे नियंत्रण?

सतत वाढत चाललेल्या ट्रॅव्हलसच्या अपघातामुळे खासगी ट्रॅव्हल्सची सुरक्षितता आणि नियमांचे पालन यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), राज्य परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांची संयुक्त जबाबदारी असते. वाहनांची फिटनेस तपासणी, चालकांची पात्रता, परवाने आणि वेगमर्यादेचे पालन यावर या यंत्रणा लक्ष ठेवतात. मात्र, वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नियंत्रण आणि तपासणी यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी जोर धरत आहे.

खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...

कानिफनाथ घाटातील अपघाताने खासगी प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.लांब पल्ल्याच्या प्रवासात वेगमर्यादेचे उल्लंघन, चालकांवरील कामाचा ताण,वाहनांची तांत्रिक तपासणी आणि घाटरस्त्यांवरील सुरक्षितता याकडे कितपत गांभीर्याने पाहिले जाते,याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या अपघातात जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी परिवहन विभाग आणि ट्रॅव्हल्स चालक-मालकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी कठोर अंमलबजावणी आणि नियमित तपासण्या आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT