

Kalyan Vishakhapatnam Highway Accident
गेवराई : कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना बुधवारी (दि.२८) सायंकाळी तिंतरवणीजवळील वडाचीवाडी परिसरात आणखी एक भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींची ओळख उशिरापर्यंत पटू शकली नव्हती.
माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच 14 जीए 0059) समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच 23 एए 7395) जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या कारने चार पलट्या घेतल्या. कारमधील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले.
या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा कल्याण-विशाखापट्टणम महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी ते पाथर्डी तालुक्यातील खरवंडीपर्यंतच्या सुमारे ५० किलोमीटर सिमेंट रस्त्याचे काम टी अँड टी कंपनीने केले आहे. मात्र अनेक ठिकाणी रस्त्याची लेव्हल बिघडलेली असून उंच-सखल भाग, निकृष्ट काँक्रीट, तडे आणि असमतोल बांधकामामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे.
वाहने अचानक ‘जंप’ होत असल्याने चालकांचा ताबा सुटून गंभीर अपघात घडत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून सातत्याने केला जात आहे. या महामार्गावर यापूर्वीही अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. तरीदेखील संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून संबंधित कंपनीला पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेला हा महामार्ग आता ‘मृत्यूचा महामार्ग’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून “आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंपनी, कामाची देखरेख करणारे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तसेच महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.