

Nagpur Sambhajinagar Road Bike head-on collision
वाशीम: कारंजा तालुक्यातील नागपूर–संभाजीनगर महामार्गावरील शेलूबाजार रस्त्यावरील मांडवा फाट्यावर बुधवारी (दि. २० ) सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन साहिल जितेंद्र उपाध्ये (वय २०, वनोजा) व सागर अरविंद सोनुने (वय २२, किन्हीराजा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातात सतीश पंजाबराव ठाकरे (वय ३५, वाई) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल उपाध्ये व सतीश ठाकरे हे शेलूबाजारहून वाईकडे जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या सागर सोनुने यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनचालकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव खडसे यांनी दोघांना मृत घोषित केले. घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून वातावरण हेलावून गेले.
दरम्यान, मृत साहिल उपाध्ये व जखमी सतीश ठाकरे हे भाजपचे कारंजा तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे यांचे अनुक्रमे भाचा व भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.