kalyan Accident | कल्याण-शिळ महामार्गावर केडीएमटी बसचा अपघात, मेट्रोच्या संरक्षक कठड्याला बस धडकली

मेट्रोचे संरक्षक पत्रे कोसळून वाहतूक ठप्प, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी
kalyan Accident | कल्याण-शिळ महामार्गावर केडीएमटी बसचा अपघात, मेट्रोच्या संरक्षक कठड्याला धडकली
kalyan Accident | कल्याण-शिळ महामार्गावर केडीएमटी बसचा अपघात, मेट्रोच्या संरक्षक कठड्याला धडकली
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर शुक्रवारी सकाळी केडीएमटीच्या बसला अपघात झाला. ही बस मेट्रो प्रकल्पासाठी उभारलेल्या संरक्षक कठड्यांवर आदळल्याने लोखंडी पत्रे रस्त्यावर कोसळले आणि वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. एकीकडे वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून अपघातस्थळावरील बस काढेपर्यंत वाहतूक नियंत्रणात आणली होती. तर दुसरीकडे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.


    या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वानऊच्या सुमारास एम एच ०५/आर १२२६ क्रमांकाची बस कल्याणहून शिळफाट्याकडे निघाली होती. मानपाडा परिसरातील विद्यानिकेतन शाळेजवळ आली असता चालकाचे अचानक बसवरील नियंत्रण सुटले. ही बस थेट रस्त्याच्या मध्यभागी मेट्रोच्या कामासाठी उभारलेल्या लोखंडी संरक्षक पत्र्यांवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की सुमारे १५ ते २० पत्रे रस्त्यावर कोसळले आणि बसचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला. अपघाताच्या वेळी बसमध्ये २५-३० प्रवासी होते. धडकेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. मात्र बसच्या चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

ऐन गर्दीच्या वेळी कोंडी अन् प्रवाशांचे हाल

सकाळची वेळ असल्याने कल्याण-शिळ महामार्गावर मार्गावर आधीच वाहनांची मोठी वर्दळ होती. अपघातामुळे रस्त्याचा एक मार्ग पूर्ण बंद झाला. त्यामुळे डी-मार्ट मानपाडा ते मानपाडा चौक या दरम्यान दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. शिळफाटा, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना कामावर पोहोचण्यास तासभर उशीर झाला.
  अपघाताची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर आणि महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने बस बाजूला करून रस्त्यावर पडलेले पत्रे हटविण्यात आले. सुमारे दीड तासानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

अरूंद रस्ता...मेट्रोचे काम कारणीभूत ?

कल्याण-शिळ महामार्गावर सध्या मेट्रो मार्गिका ५ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यभागातील मोठा भाग लोखंडी पत्रे लावून बंदिस्त करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांसाठी दोन्ही बाजूला अत्यंत अरूंद मार्ग उपलब्ध आहे. वाढती वाहनसंख्या आणि अरूंद रस्ता यामुळे या महामार्गावर सकाळ-संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

अपघातांचा धोका मात्र कायम
   
कल्याण-शिळ महामार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांसह प्रवासी संघटनांनी सांगितले की, मेट्रोच्या कामामुळे आधीच निम्मा रस्ता व्यापला आहे. त्यात अवजड वाहने, बस आणि रिक्षांची संख्या मोठी आहे. रस्त्यावर खड्डे आणि वळणावर पुरेशी सूचना फलके नाहीत. त्यामुळे अपघातांचा धोका मात्र कायम असतो. प्रशासनाने मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी वेगमर्यादा, दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी परावर्तक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

प्रशासनाची भूमिका काय ?

अपघाताच्या कारणांची चौकशी केली जाईल. चालकाचे म्हणणे घेऊन बसमध्ये काही बिघाड होता का ? याची तांत्रिक तपासणी होईल, अशी केडीएमटी प्रशासनाने या पार्श्वभूमीवर भूमिका मांडली आहे. यावर वाहतूक नियंत्रण शाखेने मात्र स्पष्ट केले की, मेट्रोच्या कामामुळे मार्ग अरूंद झाला असला तरी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाला संरक्षक कठड्यांची मजबुती तपासून पाहण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. कल्याण-शिळ महामार्ग हा ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत येथील वाहतूक नियोजन आणि सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा या अपघाताने अधोरेखित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news