Ambenali Ghat Accident : आंबेनळी घाटात आठ मित्रांवर काळाचा घाला

स्कॉर्पिओ दरीत कोसळली : कोकणात फिरून परत येताना अपघातात करूण अंत
Ambenali Ghat Accident
आंबेनळी घाटात आठ मित्रांवर काळाचा घाला
Published on
Updated on

प्रेषित गांधी

महाबळेश्वर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात शनिवारपहाटे भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीतील दाभिळ गावाजवळ स्कॉर्पिओ सुमारे 1000 फूट खोल दरीत कोसळून आठ जीवलग मित्रांवर काळा घाला घातला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री घडली असली तरी ती रविवारी रात्री उघडकीस आली. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीमसह महाड व पोलादपूर परिसरातील ट्रेकर्सनी थरारक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढले. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेने सातारा जिल्हा हादरून गेला.

Ambenali Ghat Accident
Accident: "बाबा, मी घरी येतोय..." वडिलांशी फोनवर बोलत असतानाच ट्रकने चिरडले, दोन भावांचा मृत्यू

आदित्य अशोक साळुंखे (वय 21), महेश अनिल पवार (22), रितेश राजेंद्र लोखंडे (21), सुहास जितेंद्र लोखंडे (19, सर्व रा. आसगाव, ता. सातारा), अंश समीर चव्हाण (19, मुळगाव बोरगाव, ता. चिपळूण), निखिल अभिमन्यू शिंगटे (25), उत्कर्ष आनंद शिंगटे (21, दोघे रा. मर्ढे, ता. सातारा), संदीप अशोक काटकर (35, रा. खटाव) अशी मृत झालेल्या मित्रांची नावे आहेत. अंश हा रत्नागिरी जिल्ह्यातील असून आदित्य साळुंखे या मित्राच्या कुटुंबातील लग्नकार्य असल्यामुळे तो आसगावला आला होता. अंशचे आसगाव हे आजोळही आहे.

हे मित्र शुक्रवारी रात्री 10.30 वाजता आसगाव येथून जेवण करून स्कॉर्पिओतून कोकणातील हर्णे बंदर येेथे फिरायला गेले होते. दिवसभर एन्जॉय केल्यानंतर शनिवारी रात्री ते परतीच्या प्रवासालाही लागले. पहाटे साडेचारला त्यांच्या गाडीने पोलादपूर घाट चढायला सुरुवात केली. त्यांची गाडी दाभिळ गावाच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडली त्यावेळी मागे-पुढे वाहनही नव्हते. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे कुणाच्या लक्षातही आले नव्हते. हे मित्र परत निघाले तेव्हा त्यांनी कुटुंबीयांना सकाळपर्यंत घरी येत असल्याचे फोन करून सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी सकाळी त्यांची वाट पाहिली. ते परत न आल्यामुळे त्यांनी फोनाफोनी करायला सुरुवात केली. मात्र, त्यांचे फोन लागत नव्हते. आदित्य साळुंखे याचा मोबाईल लागला. रिंग येत होती, पण फोन कोण उचलत नव्हते. सायंकाळपर्यंत अशीच परिस्थिती होती. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात चिंता दाटून आली. शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पोलादपूर हद्दीतून त्यांचे वाहन आंबेनळी घाटाकडे जात असल्याचे एका सीसीटीव्हीत कैद झाले होते. पोलिसांनी मोबाईल लोकेशनही शोधले तेव्हा ते खोल दरीत असल्याचे दिसून आले. तेथेच भीषण अपघात झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर बचाव व मदत कार्य सुरू झाले. महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमच्या टेकर्सनी जीवाचे रान करून मदतकार्याला सुरुवात केली. घटनास्थळ खोल होते. काळोख्या रात्री दरीत उतरून मदत करण्याचे आव्हान होते. मात्र, सर्वच ट्रेकर्सनी धोका पत्करून मोहीम राबवली.

महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमच्या मदतीला महाड आणि पोलादपूर परिसरातील ट्रेकर्सही धावले. महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया, कुमार शिंदे यांच्यासह प्रतापगड ट्रेकर्सच्या टीमने रविवारी रात्री 10 वाजता शोधमोहीम सुरू केली. दोरखंडाच्या सहाय्याने दरीत उतरण्यात आले. प्रथम उतरलेल्या पथकाला जुन्या अपघातातील एक वाहन आढळले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्रीनंतर शोधमोहीम सुरू ठेवली. रात्रीचा अंधार, दाट धुके आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र ट्रेकर्सनी प्रयत्न सुरू ठेवले. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास 2018 मधील दापोलीच्या खासगी बस दुर्घटनास्थळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर काही झाडे तुटलेली आणि वाकलेली दिसून आली. त्यानंतर त्या ठिकाणी दोरखंड बांधून पथक दरीत उतरले.

महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य व नगरसेवक कुमार शिंदे, सौरभ सालकर, सोमनाथ वागदरे, अमित कोळी, जयवंत बिरामणे, अर्णव शेठ, चिंतन वैष्णव, चिराग मेहता यांच्यासह सदस्य दरीमध्ये उतरले होते. त्यांना 100 फुटांवर स्कॉर्पिओचा एक आरसा, त्याखाली काही अंतरावर नंबर प्लेट व तुटलेले काही भाग सापडले. पुढे 300 मीटर दरीत एका तरुणाचा मृतदेह, तर त्याच परिसरात दुसऱ्या युवकाचा मृतदेह सापडला. त्यानंतर आणखी खोल उतरल्यानंतर इतर मृतदेह सापडले. मृतदेह दरीत विखुरलेल्या अवस्थेत पडले होते. वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले होते.

सर्व मृतदेह थेट वर काढणे कठीण असल्याने दाभिळ गावातून जंगलमार्गे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढून दाभिळ गावात आणण्यात आले. येथून वाहनाद्वारे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. रविवारी रात्री सुरू झालेले शोधकार्य सोमवारी दुपारी चारपर्यंत सुरू होते. सर्व मृतदेह पोलादपूर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. त्यानंतर रात्री नातेवाईकांच्या ताब्यात ते देण्यात आले.

दापोली बस दुर्घटनेजवळच हा अपघात

28 जुलै 2018 रोजी महाबळेश्वर-पोलादपूरच्या आंबेनळी घाटातील दाभिळ गावाच्या हद्दीत दापोलीची खासगी बस सुमारे 600 फूट खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना झाली होती. त्या अपघातात दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसह चालक असे एकूण 30 जण जागीच ठार झाले होते. त्या घटनेच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच त्याच परिसरात, अवघ्या 500 मीटर अंतरावर पुन्हा ही भीषण दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रेकर्सनी अशी राबवली शोध मोहीम...

खोल दरीमध्ये काळोख्या रात्री शोध मोहीम राबवणे सोपे नव्हते. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यु टिम व महाड आणि पोलादपूर परिसरातील ट्रेकर्स जीवाची बाजी लावून दरीत उतरले होते. रात्री 10.30च्या सुमारास शोध मोहीम सुरू झाली होती. मदत कार्य राबवताना तोल गेला तर जीव जाण्याचा धोका होता. तरीही ट्रेकर्स मागे हटले नाहीत. खोल दरीत त्यांना सुरूवातीला दोघांचे मृतदेह आढळले. हे मृतदेह दोरखंडाला बांधून दरी बाहेर काढाले. त्यानंतर इतरांचे मृतदेह सुमारेे आठशे ते नऊशे फुटांवर होते. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील हे मृतदेह अंगाचा थरकाप उडवत होते. सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढणे शक्य नसल्यामुळे दाभीळ गावामधून जंगलमार्गे दरीकडे जाण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार ट्रेकर्स टीमचे सदस्य सोमवारी दुपारी या मृतदेहांजवळ पोहचले. सर्व मृतदेह दाभीळ गावामध्ये घेऊन जाण्यात आले. येथून वाहनातून हे मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेले.

दुर्घटनेला सुमारे 12 तासांनंतर फुटली वाचा

स्कॉर्पिओचा अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास घडला त्यावेळी मागे-पुढे वाहनही नव्हते. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे कुणाच्या लक्षातही आले नव्हते. हे जीवलग मित्र परत निघाले तेव्हा त्यांनी कुटुंबीयांना सकाळपर्यंत घरी येत असल्याचे फोन करून सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी दुपारी वाट पाहून फोन केले. मात्र, कुणाचेच फोन लागत नव्हते. एक फोन लागला. त्याचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी तपासले तेव्हा ते दरीत सापडले. त्यानंतर या दुर्घटनेला वाचा फुटली व रविवारी रात्री 10.30च्या सुमारास शोधमोहीम सुरू झाली. सोमवारी सकाळी पहिला मृतदेह शोधपथकाला सापडला. सुमारे 12 तासांनंतर घटनेचा उलगडा झाला तोपर्यंत सर्व मित्रांचा खोल दरीत मृत्यू झाला होता. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहायक पोलिस निरीक्षक आनंद रावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.

त्यांना वाटायचे, ‌‘आपली मुलं जिवंत असतील...‌’

जीवलग मित्रांचा असा भीषण अंत झालेला पाहून कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता. ‌‘आपली मुलं जिवंत असतील,‌’ या आशेवर मदतकार्य सुरू असताना ते वाट पहात बसले होते. मात्र, एकामागून एक मृतदेह बाहेर येत होते तेव्हा कुटुंबीय व नातेवाईक आणखीनच भेदरून गेले. सर्व मृतदेह हाती लागल्यानंतर त्यांची भावना ‌‘आता सगळं संपलं‌’ अशीच झाली. त्यांचा आक्रोश वातावरण हेलावून टाकणारा होता.

Ambenali Ghat Accident
Dharur Ghat Accident : धारूर घाटात ट्रक-कारचा भीषण अपघात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news