कोल्हापूर

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ‘डीपीआर’

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पंचगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी 'डीपीआर' सादर झाला आहे. त्याचा सखोल अभ्यास करून पावले उचलली जातील, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पूररेषा निश्चित झाल्यानंतर राज्यातील नद्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील नद्यांचे चार प्रकारे प्रदूषण होते. कोणत्या नदीत कोणत्या प्रकारचे सर्वाधिक प्रदूषण होत आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. रंकाळा आणि पंचगंगा नदीच्या पाण्यात मिसळणारे सांडपाणी तसेच रसायनयुक्त पाण्यासह प्रदूषण करणार्‍या घटकांचे उगमस्थान शोधले जाईल. ते रोखण्यासाठीचा अभ्यास सुरू असल्याचे ते म्हणाले.

पर्यावरणपूरक महाराष्ट्रासाठी 'माझी वसुंधरा' हे अभियान प्रभावीपणे राबविले जात असल्याचे ते म्हणाले. नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाई सूडबुद्धीने होत असल्याच्या आरोपाबाबत ठाकरे म्हणाले, गेले दोन महिने उत्तर प्रदेशची निवडणूक सुरू आहे. येथील बेरोजगारी, समस्या यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष येथे काम करत आहेत. या विषयात मी जाणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू, टीका करताना विरोधी पक्षाने खालची पातळी गाठल्याचा आरोपही त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणे यांच्या बंगल्यावरील कारवाईबाबत वक्तव्य केले आहे त्याबाबत विचारता, त्यांना खूप नैराश्य आले आहे. त्यांच्यावर बोलण्यासारखे काही नाही. फडणवीस यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.

पूर रोखण्यासाठी नद्यांतील गाळ काढण्याची गरज

पावसाचे वाढते प्रमाण आणि पूर हे सारे गंभीर आहे. यामुळे नद्यांतील गाळ काढण्याची गरज आहे. त्याद़ृष्टीने जागतिक पातळीवरही अभ्यास सुरू आहे. असे सांगून ठाकरे म्हणाले, नदीत गाळ येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे नद्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात येईल, त्याबाबत अभ्यास सुरू असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT