कोल्हापूर : डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनास तीन कोटी निधी | पुढारी

कोल्हापूर : डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनास तीन कोटी निधी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील 13 अकृषी विद्यापीठातील अध्यासन केंद्रांसह शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनास प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा ठोस निधी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षण विभागाने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.

कोल्हापूर दौर्‍यावर आल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. प्र-कुलपती पद निर्माण केल्याच्या प्रश्नावर बोलताना मंत्री सांमत म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्र-कुलपती पद निर्माण करण्याच्या निर्णयाबाबत विरोधकांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. कुलपतींच्या अधिकारात राज्य सरकारने हस्तक्षेप केलेला नाही. विद्यापीठे आणि शासन यांच्यात समन्वय राहावा यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल केला आहे. महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा निर्णय अद्याप झालेला नाही. वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे मंत्री सामंत म्हणाले.

प्राध्यापक भरतीचा जीआर दोन दिवसांत काढणार

संवर्गनिहाय प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याअनुषंगाने प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसा जीआरदेखील दोन दिवसांत काढणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Back to top button