कोल्हापूर : ताफा थांबवून आदित्य ठाकरेंनी ऐकले महिला आंदोलकांचे गार्‍हाणे | पुढारी

कोल्हापूर : ताफा थांबवून आदित्य ठाकरेंनी ऐकले महिला आंदोलकांचे गार्‍हाणे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

वाहनांचा ताफा थांबवून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आंदोलन करणार्‍या महिलांचे गार्‍हाणे ऐकले. वाहनातून खाली उतरून सुमारे दहा मिनिटे त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने फायन्सास कंपन्याचे कर्ज माफ व्हावे, बेकायदेशीर वसुली करणार्‍यांवर कारवाई करावी, रिक्षाचालकांना पेट्रोल, डिझेल द्यावे या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी जाताना ठाकरे यांनी आंदोलकांची माहिती घेतली होती.

बैठक आटोपून परत जाताना ठाकरे यांनी आपले वाहन या आंदोलकांसमोर थांबवले. मात्र, पोलिसांनी वाहनाभोवती गराडा घातला. आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ठाकरे यांनी त्यांना येऊ द्या, अडवू नका असे सांगत ते वाहनातून खाली उतरले.

ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई यांनी मागण्याचे निवेदन दिले. मायक्रो फायन्सासची कर्जे माफ करा, रिक्षा चालकांना ठराविक लिटर मोफत डिझेल, पेट्रोल द्या, अनुसूचित जाती जमातीच्या दाखल्यांसाठी 1950 च्या महसूल पुराव्याची अट शिथिल करा आदी मागण्या केल्या. यावर आपला क्रमांक द्या, असे सांगत याबाबत जे करता येईल ते करू, असे आदित्य ठाकरे यांनी सांगत आपला ताफा विमानतळाच्या दिशेने रवाना केला.

Back to top button