शरद काळे, शिरोळ : टाकळी (ता. शिरोळ) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला ऐनापुरे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चौकशीच्या शेवटच्या दिवशी टाकळी ग्रामस्थांनी चौकशी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. डॉ. ऐनापुरे यांना निलंबित करा, बनावट फिरती दौरा दाखवून भत्ता स्वरूपात शासनाचे लुबाडलेले पैसे वसूल करा आणि कोरोना काळात हलगर्जीपणामुळे दगावलेल्या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार धरून मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लोकनियुक्त सरपंच हर्षदा पाटील यांच्यासह नागरिकांनी केली.
चौकशी तथा सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी डॉ. ऐनापुरे यांना सोमवारपासून टाकळी प्रा. आ. केंद्रात न येण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगून, त्यांना जिल्हा आरोग्य विभागात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे स्पष्ट केले. तसेच नागरिकांच्या तीव्र भावना आणि चौकशीतील कागदपत्राच्या आधारे प्राप्त अहवालानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे हे पुढील दोन दिवसात डॉ. ऐनापूरे यांच्या बदलीचा (शिरोळ तालुका वगळून) आदेश करतील. त्यानुसार जिल्ह्यात अन्यत्र ठिकाणी बदली करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. मदने व डॉ. बाबासाहेब लांब यांनी ग्रामस्थांना दिले.
दरम्यान, चौकशी पथकाकडून टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रासह 9 उपकेंद्राच्या संबधित आशा स्वयंसेविका, कर्मचारी, सरपंच हर्षदा पाटील, रुग्ण कल्याण समितीचे पदाधिकारी व टाकळी गावातील सहा महिला व पुरुषांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. टाकळी आणि परिसरातील ग्रामपंचायती तसेच शिवाजीराव पाटील प्रबोधनी व ग्रामविकास संस्था, आंदोलन अंकुश संघटनेने डॉ. ऐनापुरे यांच्या अनागोंदी कारभाराविषयी दिलेले ठराव व निवेदनानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी तात्काळ बदलीचे आदेश दिले होते. त्याचबरोबर सोमवारपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चौकशी पथकाने तात्काळ निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्याला आरोग्य केंद्रात येण्यास मज्जाव केला आहे.
टाकळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार दै. पुढारीने प्रा. आ. केंद्राच्या कामकाजाची वस्तुनिष्ठ वृत्ते प्रसिद्ध करून गैरकारभाराला वाचा फोडली. जिल्हा प्रशासनाच्या चौकशी पथकाने पाच दिवस चौकशी करून डॉ. ऐनापुरे यांना टाकळी आरोग्य केंद्रात न येण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे टाकळीसह नऊ उपकेंद्रातील गावांनी स्वागत करून दै. पुढारीचे अभिनंदन केले.
हेही वाचलं का?