कोल्हापूर

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाचे ग्राऊंटिंग काम  लांबणीवर, पाणीसाठा कमी करण्याची शक्कल अंगलट

मोहन कारंडे

राशिवडे : प्रवीण ढोणे : चाळीस वर्षांपुर्वी म्हणजेच १९८३ साली पुर्णत्वास आलेल्या २३९ फुट उंच आणि ४२०० फुट लांबीच्या २८ टी.एम.सी.पाणीसाठवण क्षमता असलेल्या काळम्मावाडी धरणाला गळतीचे ग्रहण लागले आहे. ही गळती रोखण्यासाठीच्या प्रस्तावित ग्राऊंटीग कामाचे अंदाजपत्रक प्रस्ताव मंजुरी, निधी तरतूद आणि निविदा प्रक्रिया होण्याआधीच पाणीसाठा कमी करण्याची शकल्ल जलसंपदा विभागाच्या अंगलट आली आहे. पावसाळा लांबल्यास दुधगंगा खोऱ्यामध्ये पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

काळम्मावाडी धरणाला लागलेले गळतीचे ग्रहण रोखण्यासाठी आर्थिक तरतूद, निविदा प्रक्रिया अपेक्षित वेळेत झाली नसल्याने ग्राउंटिग काम लांबणीवर पडले आहे. पाणीसाठ्यात केलेली घट वादाचा मुद्दा ठरला आहे. यंदा कदाचित अल- निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्यास दूधगंगा खोऱ्यात पाणीटंचाईची भीती वाढली आहे.

एप्रिल महिन्यात पाणीसाठयात अपेक्षित घट होऊन यंदाच्या मे महिन्यात ग्राऊंटीग कामाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या पावसाळ्यात धरणात संचयक्षमतेपेक्षा सहा टीएमसी पाणीसाठा कमी करण्यात आला. ग्राऊंटीग अंदाजपत्रक प्रस्ताव, आर्थिक तरतूद आणि निविदा प्रक्रिया मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होईल. असा अंदाज करुन आखलेले नियोजनच पुर्णपणे फसले आहे. सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला. प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या छाननीच्या मर्यादेतच राहिला आहे. शासन मंजुरी, आर्थिक तरतूद तात्काळ होऊन, निविदा प्रक्रियेसाठी प्रभावी पाठपुरावा झाला नाही. परिणामी यंदाच्या मे महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा कालबद्ध कार्यक्रम कागदावरच राहिला आहे.

धरणाच्या मुख्य भिंतीतून ऑगस्ट १९९९ पासून गळती सुरू झाली. गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना सुचवण्यासाठी नियुक्त तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार २०१४ पर्यंत टप्प्याटप्प्याने ग्राऊंटींग काम झाले. गळतीचे प्रमाण ७० टक्के पर्यंत कमी झाले. मात्र २०२१ पासून पुन्हा गळतीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संघटनेच्या (CWPRS) तज्ञ समितीने धरण स्थळाची पाहणी करून पुन्हा ग्राउंटिग उपायोजनात सुचित केली. त्यानुसार ग्राउंटिग कामाचे अंदाजपत्रक प्रस्ताव तयार झाला. प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्यानंतर शासन मंजुरी, आर्थिक तरतूद आणि निविदा प्रक्रिया हे टप्पे पूर्ण होण्यास लागणाऱ्या कालावधीचा अभ्यासच झाला नाही. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीच्या पाठबळा अभावी कार्यवाहीला चालढकलच झाली. त्यातून ग्राऊंटीगचे काम लांबणीवर पडलेच आणि पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये दूधगंगा धरणाचा अकरावा क्रमांक येतो. दूधगंगा या धरणाची उंची ७३ मीटर म्हणजेच २३९ फूट आहे. या धरणाची लांबी १२८० मीटर म्हणजेच ४२०० फूट आहे. दूधगंगा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २८ टीएमसी म्हणजेच २८ हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे. दूधगंगा धरणाला पाच दरवाजे आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT