कोल्हापूर : पंचगंगेच्या पुराचे पाणी कमी होऊ लागल्याने रविवारी व्हीनस कॉर्नर-दसरा चौक मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.  Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : महापुराला उतार; विळखा सैल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पंचगंगेच्या महापुराचा शहरासह परिसराला पडलेला विळखा रविवारपासून सैल होऊ लागला. शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, धरणातील विसर्गही कमी होत गेला. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून वाढत चाललेली पंचगंगेची पातळी रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून कमी होऊ लागली आहे. यामुळे पुरालाही उतार सुरू झाला असून, पूरग्रस्त नागरिकांसह शहरालाही दिलासा मिळाला आहे. शहरातील तीन रस्ते पाणी ओसरल्याने वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.

* ‘राधानगरी’चे दोन दरवाजे अद्याप खुलेच

* पंचगंगेची पातळी 47 फुटांपर्यंत खाली

* व्हीनस कॉर्नरचे पाणी ओसरायला सुरू

* असेम्ब्ली रोडवरचे पाणीही ओसरले

* जयंती नाल्यावरील पूल आज वाहतुकीस खुला होण्याची शक्यता

* कोल्हापूर-गांधीनगर मार्गावर एकेरी वाहतूक

रात्री 9 वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी 47 फुटांपर्यंत खाली

पंचगंगेची पातळी शनिवारी रात्री 9 वाजता 47.8 फुटांवर गेली. यानंतर रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत आठ तास पातळी स्थिर राहिली. सकाळी सहा वाजल्यापासून पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता पाणी पातळी 47.7 फूट झाली. ती कमी होण्यास सुरुवात झाली. दिवसभरात 8 इंचांनी पाणी पातळीत घट झाली. रात्री 9 वाजेपर्यंत पातळी 47 फुटांपर्यंत खाली आली होती.

व्हीनस कॉर्नर येथे आलेले पाणी वेगाने ओसरत आहे

पाणी पातळी कमी होत चालल्याने पुराचा विळखाही सैल होत चालला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात व्हीनस कॉर्नर येथे आलेले पाणी वेगाने ओसरत आहे. यामुळे व्हीनस कॉर्नर-दसरा चौक मार्ग दुपारनंतर खुला झाला. शाहूपुरी सहाव्या गल्लीत आलेले पाणीही मागे सरकले, यामुळे या गल्लीतील वाहतूक सुरू झाली. स्टेशन रोड-जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर (असेम्ब्ली रोड) आलेले पाणीही ओसरले, यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. जयंती नाल्यावरील पाणी पातळी कमी होत चालली आहे. सोमवारी हा मार्गही खुला होईल, अशी शक्यता आहे. शनिवारी पंचगंगा तालमीपुढे गेलेले पाणी आज रात्री पुन्हा तालमीसमोर आले.

वाढलेल्या पाण्याची पातळी कमी होत आहे

शहरात रविवारी रात्री उशिरा व्हीनस कॉर्नर-कोंडा ओळ मार्गासह शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणी होते. बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत, लक्षतीर्थ वसाहत आदीसह पुराचे पाणी शिरलेल्या परिसरात वाढलेल्या पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. तावडे हॉटेल पुलाखाली पाणी आल्याने कोल्हापूर-गांधीनगर मार्गावरील थेट वाहतूक सकाळी काही काळ बंद करण्यात आली. काही वेळानंतर चारचाकी वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होती. दुचाकी वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. गांधीनगरकडे जाणार्‍या अनेकांनी दुचाकी महामार्गाच्या दुभाजकावरून उचलून पलीकडे नेल्या. कोल्हापूरकडे येणारे दुचाकीधारक उचगावमार्गे येत होते. महापालिकेकडून पूर ओसरलेल्या भागात साचलेला कचरा काढून त्या ठिकाणी स्वच्छता केली जात आहे.

आज दिवसभर पावसाची उघडीप

कोल्हापूर शहरात आज दिवसभर पावसाने उघडीप दिली. अधूनमधून पडलेली एखाददुसरी सर वगळता पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यातही पावसाचा जोर तुलनेने कमी झाला. शनिवारी सकाळी सात ते रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत राधानगरी (98), तुळशी (125), कासारी (77), कुंभी (73), पाटगाव (66), चित्री (105), घटप्रभा (120), जांबरे (165), सर्फनाला (70) व कोदे (83 मि.मी.) या धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. मात्र, आज दिवसभर धरण क्षेत्रांतही पावसाचा जोर कमी झाला. दिवसभरात नऊ तासांत राधानगरीत 32, तुळशीत 55, वारणेत 28, तर दूधगंगा धरण परिसरात 14 मि.मी. पाऊस झाला होता.

राधानगरीचे 6 व 7 क्रमांकाचे दोनच स्वयंचलित दरवाजे सुरू आहेत, या दरवाजांसह धरणातून एकूण 4 हजार 356 क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून सुरू असलेला 16 हजार 976 क्युसेक विसर्ग रात्री 12 हजार 4 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. दूधगंगा धरणातून 8 हजार 100 क्युसेक, तुळशीतून 1,500, तर कासारीतून 1,270 क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 16.6 मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात 37.9 मि.मी. इतका झाला. राधानगरीत 35.3 मि.मी. आणि भुदरगडमध्ये 30.5 मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडीत 26.3, तर गगनबावड्यात 26.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्यांत 15 मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT