साडवली, पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील आंबवली वरचीवाडीतील जयराम सावंत यांच्या 'नव्याचे पाणी' याठिकाणी वापरात नसलेल्या विहिरीत गवा पडल्याची घटना गुरूवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या गव्याची देवरूख वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सुटका केली.
याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबवली वरचीवाडीतील जयराम सावंत यांच्या मालकिची 'नव्याचे पाणी' याठिकाणी विहीर असून ही विहीर सध्या वापरात नसून ती पडीक स्वरूपाची आहे. या विहिरीत सध्यस्थितीला चार फुटांपर्यंत पाणी आहे. गुरूवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास या विहिरीजवळून काही ग्रामस्थ जात असताना त्यांना पाण्याचा आवाज येऊ लागला. याचवेळी त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता गवा दिसून आला. हा गवा विहिरीबाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होता.
विहिरीत गवा पडला असल्याची बाब ग्रामस्थांनी सरपंच संतोष सावंत यांच्या कानावर घातली. यानंतर याची माहिती सावंत यांनी देवरूख वनविभागाला दिली. गवा विहिरीत पडल्याची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी दिपक खाडे, परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड यांच्यासमवेत देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे, राजाराम पाटील, आकाश कडूकर, सूरज तेली, संजय रणधीर, राहूल गुंठे आदिंनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची खात्री केली. यावेळी ही विहीर अडचणीच्या ठिकाणी असल्याने कोणतेही वाहन (जेसीबी) जाग्यावर जाणे अशक्य होते.
अशावेळी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना मदतीला घेऊन विहीर एका बाजूला खोदण्याचे काम सुरू केले. गवा विहिरीबाहेर येईल एवढे खोदकाम झाल्यानंतर गवा रेड्याने विहिरीबाहेर येत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. हा गवा सुमारे ४ वर्षे वयाचा असून तो नर जातीचा होता. तसेच तो सुस्थितीत होता. विहिरीला कठडा नसल्याने व विहिरीवर ग्रीन शेडनेट असल्याने अंदाज न आल्याने गवा विहिरीत पडला असावा, असे देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला यांनी सांगितले.
गवारेड्याच्या सुटकेसाठी गावचे सरपंच संतोष सावंत, पोलीस पाटील अजित मोहिते, ग्रामसेविका शलाका नटे, श्रीकृष्ण सावंत, संकेत कारकर, अक्षय चिमाणे, मोहन मोरे, अक्षय झगडे, भागोजी आखाडे, अजय सावंत, महेश घाग, गुरूनाथ भेरे, जितेंद्र मोहिते, विकास मोहिते आदिंनी वनविभागाला सहकार्य केले. तर विभागीय वनाधिकारी दिपक खाडे यांनी पुर्णवेळ उपस्थित राहून गव्याच्या सुटकेसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तर गव्याच्या सुटकेसाठी वनविभागाला सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांना धन्यवाद दिले.