फडणवीसांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून २० कोटींची देणगी घेतली; ईडीकडे तक्रार ! | पुढारी

फडणवीसांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून २० कोटींची देणगी घेतली; ईडीकडे तक्रार !

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईमधील बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिरची हा भागीदार असलेल्या संस्थेकडून 20 कोटी रुपयांची देणगी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेतली गेल्याची तक्रार आज माजी भाजप आमदार अनिल गोटे यांनी ईडीकडे केली आहे. तिसऱ्या व्यक्तीकडून जमीन घेतल्या प्रकरणात राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाई प्रमाणेच तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर इडीने कारवाई करावी अशी अपेक्षा माजी आमदार गोटे यांनी व्यक्त केली आहे.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर इडीच्या माध्यमातुन कारवाई झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ईडीकडे गंभीर तक्रार केली. या तक्रारीची माहिती देताना माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की, निवडणूक आयोग यांच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये ४६ नंबरवर आर के डब्ल्यू म्हणजेच राजेश कुमार वाधवान यांचे नाव आहे. वाधवानने पंजाब बँकेला नुकसान केले.

या प्रकरणात त्यांच्यावर यापूर्वी कारवाई झाली आहे. त्याच्या कंपनीचा इक्बाल मिरची हा भागीदार असून इक्बाल मिरची याच्यावर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात गंभीर आरोप असून यातील तो आरोपी आहे. राज्यामध्ये 2014-15 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले. या नंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस हे आल्यानंतर इक्बाल मिरची यांच्याकडून दोन वेळेस प्रत्येकी दहा कोटी रुपयांची देणगी दिली गेली, असा आरोप गोटे यांनी केला आहे.

आपण 2003 पासूनची माहिती तपासून पाहिली असता भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीने देणगी दिली गेली नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. इक्बाल मिरची हा दाऊद इब्राहिम यांचा उजवा हात असून 1993च्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचा तो मुख्य आरोपी आहे. त्यामुळे जर मंत्री नवाब मलिक यांनी तिसऱ्या माणसाकडून जमीन खरेदी केल्या प्रकरणाचा आरोपात ईडी त्यांच्यावर कारवाई करत असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या कालावधीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून आलेल्या पैसे प्रकरणाची इडीने कारवाई केली पाहिजे, असे गोटे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात इडीने सात दिवसात कारवाई न केल्यास आपण न्याय मिळवण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करणार असल्याचा इशारा गोटे यांनी दिला आहे. त्याच प्रमाणे आठवड्याच्या दर मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन सरकारमधील एका मंत्र्याची तक्रार पुराव्यासह ईडी कडे करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button