अहमदनगर

17 जुलैला मतदान; 18 ला निकाल: शिक्षक बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांसाठी प्रतिष्ठेची बनलेली शिक्षक बँकेची निवडणूक काल जाहीर झाली आहे. 13 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, तर 17 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच शिक्षकांच्या बैठकांना वेग आला आहे.

शिक्षक बँकेच्या गेल्या निवडणुकीत रावसाहेब रोहोकले- बापूसाहेब तांबे यांच्या गुरुमाऊली मंडळाने 21 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. मात्र, त्यानंतर सत्ताधार्‍यांमध्ये खटके उडाल्याने रोहकले-तांबे गट वेगळे झाले. त्याचा या निवडणुकीत या दोन्ही गटांना फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे.

शिवाय गुरुकुलचे डॉ. संजय कळमकर यांनाही लोकं सोडून जात असल्याचे चित्र राहुरीतून पहायला मिळते. तसेच 'सदिच्छा' सत्तेच्या इच्छापूर्तीसाठी तांबे-रोहकलेंवर विसंबून आहे. या उलट ऐक्य, स्वराज्य, शिक्षक भारती, इब्टा अशा अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी जिल्हाभरात आपले स्वतंत्र जाळे विणले आहे. या संघटनांत नव्या दमाने कार्यकर्ते तयार झाल्याने त्यांची मते निर्णायक ठरणार असल्याचेही बोलले जात आहे.

मे महिन्यात निवडणुकीचा प्रोग्राम सुरू झाला होता. 10502 सभासदांची प्रारुप मतदार यादी जाहीर झाली. त्यावर हरकतीनंतर 30 मे रोजी 10464 सभासदांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होणार असल्याचे ओळखून शिक्षक संघटनांच्या तशा हालचाली वाढल्या होत्या. काल बुधवार दि. 1 जून रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10464 सभासद 21 संचालक निवडूण देणार आहेत.

मुले शाळेत, शिक्षक निवडणुकीत!

13 जूनपासून शाळा सुरू होेणार आहे. तर शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी देखील 13 जूनपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळेत, तर शिक्षक नेते अर्ज भरण्याच्या धावपळीत पहायला मिळणार आहेत. याकडे जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील कसे नियंत्रण ठेवतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

जागांचा तपशील
सर्वसाधारण :14
(प्रत्येक तालुक्याला 1 जागा)
पालिका, भिंगार कॅन्टोन्मेंट 2
अनुसूचित जाती/जमाती 1
महिला प्रतिनिधी 2
इतर मागासवर्गीय 1
भटक्या विमुक्त जाती जमाती 1

निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरणे 13 ते 17 जून
छाननी 20 जून
माघारीची मुदत 21 जून ते 5 जूलै
मतदान 17 जुलै
(सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी 18 जुुलै

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT