

मिरज : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच भाजपला फसविले आहे. त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार नितेश राणे यांनी मिरजेतील सभेमध्ये केली. महाविकास आघाडीमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसल्याचीही टीकाही यावेळी आ. राणे यांनी केली.
महापालिकेचे स्थायी सभापती निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील विविध कामांचा प्रारंभ आ. राणे यांच्याहस्ते झाला. प्रभाग चारमध्ये 'नेता आपल्या दारी' या अत्याधुनिक डिजिटल अॅपचे उद्घाटन, कबड्डी, हॉलीबॉल, टेनिस क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण, भाजप युवा वॉरियर्सचे उद्घाटन आ. राणे यांच्याहस्ते झाले.
आ. राणे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वडिलांना दिलेली शपथ पूर्ण करायची होती. त्यामुळे त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. एका बाजूला शरद पवार आणि दुसर्या बाजूला काँग्रेसची पिलावळ राज्य करीत आहे. त्यांनी भाजपला फसवून राज्यामध्ये सत्ता काबिज केली आहे. शिवसेना, काँग्रेसच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत, पण त्यांना विकास कामे करता आलेली नाहीत. नगरसेवक संदीप आवटी यांनी संयोजन केले. यावेळी आमदार सुरेश खाडे, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, शेखर इनामदार उपस्थित होते.