आरक्षणाने आघाडीत बिघाडी; पंधरा प्रभागांत होणार रस्सीखेच

आरक्षणाने आघाडीत बिघाडी; पंधरा प्रभागांत होणार रस्सीखेच
Published on
Updated on

पांडुरंग सांडभोर

पुणे : महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर आता आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात महाविकास आघाडीसाठी मोठा कस लागण्याची शक्यता आहे. महिला आरक्षणामुळे या तीन पक्षांचे इच्छुक असलेल्या किमान पंधरा प्रभागांतील गणिते बिघडली असून, त्याचा थेट परिणाम संभाव्य आघाडीवर होण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी महापालिकांच्या निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीला काँग्रेसच्या प्रदेशनेतृत्वाने स्वबळाचा नारा दिला आहे, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आघाडीबाबत ठाम आहेत. आता थेट निवडणुका जाहीर झाल्यावर चित्र स्पष्ट होईल.

मात्र, पुणे महापालिकेत महिला आरक्षण सोडतीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या तीन पक्षांचे अनेक इच्छुक एका जागेसाठी आमने-सामने आले आहेत. परिणामी, कोणी कोणाला जागा सोडायची, या मुद्द्यावर आघाडीत थेट बिघाडी होऊ शकते. जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांत हा संघर्ष होणार आहे.

वडगाव शेरी मतदारसंघात प्रभाग क्र. 6 मध्ये सेनेचे सचिन भगत आणि नितीन भुजबळ दोघेही इच्छुक असून, या ठिकाणी केवळ राष्ट्रवादीकडेही मातब्बर इच्छुक असल्याने सेनेला जागा कशी सोडायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या टर्मला येरवडा भागात सेनेचे तीन नगरसेवक होते.

आता विद्यमान प्रभाग क्र. 9 येरवडा येथे तीन जागांवर सेनेचा दावा कायम असला, तरी राष्ट्रवादीला या ठिकाणी दोन जागा हव्या आहेत. काँग्रेसच्या संगीता देवकर याही इच्छुक आहेत. त्यामुळे संपूर्ण वडगाव शेरीत सेनेच्या आणि काँग्रेसच्या वाट्याला नक्की किती जागा येणार, हा प्रश्न असून त्यामुळे या मतदारसंघात आघाडीला सुरुंग लागू शकतो.

शिवाजीनगर मतदारसंघात प्रभाग क्र. 10 मध्ये एका सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके आणि सेनेचे राजू पवार इच्छुक आहेत, तर प्रभाग क्र. 15 गोखलेनगर-वडारवाडी या प्रभागात दोन सर्वसाधारण जागा आहेत. त्यामध्ये काँग्रेसकडून दत्ता बहिरट, राष्ट्रवादीकडून नीलेश निकम, उदय आंदेकर, दया इरकल, सेनेचे विनोद ओरसे, नितीन मंजाळकर यांच्यासह आणखी इच्छुकांची मोठी यादी आहे.

त्यामुळे कोणती जागा कोणाला कशी देणार, हा प्रश्न आहे. प्रभाग क्र. 11 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत एका सर्वसाधारण जागेसाठी रस्सीखेच होऊ शकते. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये प्रभाग क्र. 19 मध्ये अनुसूचित जाती या आरक्षित जागेसाठी सेनेच्या पल्लवी जावळे, राष्ट्रवादीचे लक्ष्मण आरडे, तसेच राष्ट्रवादीचे सदानंद शेट्टी इच्छुक आहेत.

प्रभाग क्र. 20 पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता या प्रभागात काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड, तर अनुसूचित जाती महिला या जागेवरून काँग्रेसच्या लता राजगुरू व राष्ट्रवादीचे माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या स्नुषा इच्छुक आहेत.

वानवडी गावठाण- वैदूवाडी या प्रभाग क्र. 26 मध्ये एकच सर्वसाधारण जागा असून, त्यामध्ये राष्ट्रवादीचे आनंद आलकुंटे आणि काँग्रेसचे अभिजित शिवरकर, तर प्रभाग क्र. 27 मध्ये कासेवाडी-लोहियानगर या प्रभागात एकच सर्वसाधारण जागा असून, त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचा दावा आहे.

प्रभाग क्र. 28 महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ या ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबीय, तर सेनेकडून विशाल धनवडे आग्रही असणार आहेत. कोथरूड मतदारसंघात प्रभाग क्र. 30 जयभवानीनगर-केळेवाडी या प्रभागात दीपक मानकर व काँग्रेसचे चंदू कदम, वैशाली मराठे एकत्र आले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा असल्याने येथे जागा वाटपाचा तिढा होणार आहे.

पर्वती मतदारसंघात प्रभाग क्र.38 मध्ये शिवदर्शन-पद्मावती या प्रभागात राष्ट्रवादीचे नितीन कदम, अश्विनी कदम, काँग्रेसचे आबा बागुल, शिवसेनेचे अशोक हरणावळ अशी रस्सीखेच रंगणार आहे. प्रभाग क्र. 48 अप्पर-सुप्पर इंदिरानगर येथे एकच जागा सर्वसाधारण असून, त्यावर सेनेचे बाळा ओसवाल दावेदार असतानाच राष्ट्रवादीकडून या जागेवर आता दावा करण्यात येत आहे.

हडपसर मतदारसंघात प्रभाग क्र. 46 महंमदवाडी- उरुळी देवाची या प्रभागात शिवसेनेचे नाना भानगिरे आणि प्राची आल्हाट प्रमुख दावेदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडेही या ठिकाणी मातब्बर उमेदवार असल्याने पेच निर्माण झाला आहे. एकंदरीतच जागा वाटपाचा हा तिढा सोडविताना सर्वच पक्षांची दमछाक होणार आहे.

आघाडीत बिघाडी करणारे प्रभाग

प्रभाग क्र. 6 – वडगाव शेरी
प्रभाग क्र. 9 – येरवडा
प्रभाग क्र. 10 – शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी
प्रभाग क्र. 11- बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
प्रभाग क्र. 12- औंध-बालेवाडी
प्रभाग क्र. 15 – गोखलेनगर-वडारवाडी
प्रभाग क्र. 19 – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ
प्रभाग क्र. 20 – पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता
प्रभाग क्र. 26 – वानवडी-गावठाण- वैदूवाडी
प्रभाग क्र. 27 – कासेवाडी -लोहियानगर
प्रभाग क्र. 28 – महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ
प्रभाग क्र. 30 – जयभवानीनगर-केळेवाडी
प्रभाग क्र. 38 – शिवदर्शन-पद्मावती
प्रभाग क्र. 46 – महंमदवाडी-उरुळी देवाची
प्रभाग क्र. 48 – अप्पर-सुप्पर इंदिरानगर

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news