कडेगाव तालुक्यात अवैध धंदे रोखणार कोण?

कडेगाव तालुक्यात अवैध धंदे रोखणार कोण?
Published on
Updated on

कडेगाव : रजाअली पिरजादे

कडेगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा मटका, जुगार, दारू, गुटखा, सावकारी गौण खनिज तस्करी आदी अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून याकडे पोलिस प्रशासनांसह स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कडेगाव तालुक्यात स्वतंत्र महसूल विभाग तसेच कडेगाव व चिंचणी- वांगी, असे दोन स्वतंत्र पोलिस ठाणे असतानादेखील शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे जोमात सुरू आहेत. वाढत्या अवैध धंद्यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सगळे खुलेआम सुरू असताना हे स्थानिक प्रशासन करतायत तरी काय, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

कडेगावसह तालुक्यात 55 गावांचा समावेश येतो. कडेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे ये – जा करणार्‍या लोकांची गर्दी असते. शुक्रवारी आठवडा बाजार असतो. या बाजारात भुरट्या चोरांची संख्या वाढली असून किरकोळ चोरीचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर शेती अवजारांच्या साहित्याची चोरीही वाढली आहे. तालुक्यात सर्वत्र खुलेआम गुटखा, मावा, सुपारी विक्री केली जात आहे. शहरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर एमआयडीसी येथे खुलेआम बेकायदा पत्ते व जुगार सुरू असून, याकडेही कानाडोळा केला जात आहे.

बेकायदा सावकारी वाढली

बेकायदा सावकारीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मासिक 10 ते 15 टक्के आकारणी सावकार करतात. व्याज दिले नाही तर व्याजापोटी जप्त करून आणलेल्या अनेक दोन, चारचाकी वाहनांचा बाजार सावकारांच्या घरासमोर दिसून येतो. फोफावलेले सावकार तारण म्हणून कोरे चेक व दस्त ऐवजांचा साठा करतात. याद्वारे संबंधित पीडितांचे जमीन व घरे नावे करून घेत असल्याचे प्रकार दिसतात. आमच्याकडे कोणाची तक्रार नसल्याचे म्हणत संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, स्वतःहून अचानक छापा सत्र टाकून तपासणी केल्याचे कधी होत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news