खटाव : अविनाश कदम
दुष्काळ पाचवीला पुजलेला, पावसाच्या भरवशावरील कोरडवाहू शेतीत आर्थिक ओढाताणीमुळे खरीप आणि रब्बीची पिके घेणेही मुश्कील. अशा प्रतिकूल परिस्थितीत आस्मानी संकटांचा सामना करणार्या खटावमध्ये चक्क लाल चुटूक स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती होतेय यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, मात्र ही किमया येथील शेतकर्याने साधली आहे. खटावमध्ये स्ट्रॉबेरी उत्पादित होत असल्याने भागातील शेतकर्यांनाही आशेचा किरण दिसू लागला आहे.
स्ट्रॉबेरीची शेती म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं ते निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर. पण आता हीच स्ट्रॉबेरी चक्क खटावसारख्या दुष्काळी भागात बहरलेली पहावयास मिळत आहे. पुसेगाव येथील शेतकर्यांनी स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुका म्हणजे कायमच दुष्काळाने ग्रासलेला. या पट्ट्यात शेती ही राम भरोसेच असते. शेतकर्यांच्या मेहनत आणि शेती उत्पादनावर लहरी निसर्ग अक्षरशः पाणीच फेरतो. एकतर पावसाचं प्रमाण अगदीच नगण्य, झालाच तर धो-धो बरसतो, तो ही जेव्हा अपेक्षित असतो तेव्हा अवकृपा दाखवतो. अशा अनेक समस्या झेलताना शेतकर्यांच्या पदरी मात्र निराशाच येते. पिकासाठी खर्ची घातलेला पैसा हाती येण्याची देखील शाश्वती नसते.
अशा परिस्थितीत प्रयोगशील शेतकरी राजेश देशमुख यांनी तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कोचरेकर आणि प्रशांत भोसले या त्यांच्या सहकार्यांनी खटावच्या दुष्काळी जमिनीवर स्ट्रॉबेरीचे पीक जोमात आणले असून कमी दिवसात अधिक पैसे कमवण्याची किमया साधली आहे. सुरुवातीला देशमुख यांच्यासमोर थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात कशी पिकवायची हे मोठे आव्हान होतं. यासाठी त्यांनी महाबळेश्वर मधील तज्ज्ञ शेतकर्यांना या ओसाड जमिनीवर आणलं.
या उष्ण तापमानात स्ट्रॉबेरीची शेती कशी करायची याबाबत मार्गदर्शन घेतलं. तीन वर्षे यावर अभ्यास करुन ऑगस्टमध्ये तीस गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले. ऑक्टोबरमध्ये ही स्ट्रॉबेरी बहरली. आता एकदिवसाआड पंधरा ते वीस हजारांप्रमाणे महिन्याकाठी अडीच ते तीन लाखांची उलाढाल सुरू आहे. पण प्रयोग इथंच थांबला नाही, त्यांनी स्ट्रॉबेरीमध्ये आंतरपीक घ्यायला सुरुवात केली आहे. सध्या स्ट्रॉबेरी शेतीच्या काही क्षेत्रात लसणाची लागवड करण्यात आली आहे.
तर उर्वरित क्षेत्रात दुसरं आंतरपीक घेण्याच्या ते तयारीत आहेत. सध्या हैदराबाद आणि गोव्याच्या बाजारात या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. त्यामुळेच रोज स्ट्रॉबेरीची तोड केली जाते. पॅकिंगही शेतातच केलं जातं. परिसरातील शेतकर्यांनी इच्छा व्यक्त केल्यास त्यांच्या सोबतीने या दुष्काळी भागात स्ट्रॉबेरीची आणखी शेती पाहायला मिळेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
खटाव दुष्काळी भाग असला तरी आम्ही नावीन्यपूर्ण प्रयोग करायचे ठरविले. ऑगस्टमध्ये स्ट्रॉबेरीची रोपे आणून सप्टेंबरमध्ये लागवड केली. गेल्या दीड महिन्यापासून उत्पन्न सुरू आहे. तंत्रशुद्ध शेती केली तर सर्वांचाच फायदा होणार आहे.
– राजेश देशमुख, शेतकरी.