

कोरोनानंतर ज्या ज्या श्वसनविकारांनी तोंड वर काढले, त्यामध्ये क्षयरोगाचा वरचा नंबर आहे. त्यामुळे ज्यांना कोरोना होऊन गेला आहे आणि ज्यांच्या श्वसनाच्या काही तक्रारी पाठ सोडत नाहीत, विशेषत: अशक्तपणा – खोकला – दम लागणे – भूक न लागणे अशा तक्रारी असतील, तर अशा रुग्णांनी आपली चाचणी करून घेऊन उपचार सुरू करणे महत्त्वाचे ठरते.
कोरोना संपणार… तिसरी लाट जाणार… महाराष्ट्र मास्कमुक्त होणार… अशा अनेक बातम्या आपण दररोज ऐकत असलो, तरी अजून आपल्याभोवती कोरोना आहे. अल्फा, बीटा, डेल्टा, ओमायक्रॉन आणि आता त्यानंतर येऊ घातलेला निओकोव्ह… मोबाईलचे नवीन मॉडेल एकामागून एक यावेत, तसे कोरोनाचे व्हेरियंट येतच आहेत आणि सामान्य माणसाला एकामागून एक भीतीचे धक्के देत आहेत.
लसीकरणाची साथ आहे. काही लोकांना त्याचा धाक वाटतो. पहिला झाला, दुसरा झाला आता बूस्टर डोस आला आहे; पण ज्यांना ज्यांना कोरोना झाला, त्यांना त्यांना खूप मोठा आरोग्याचा डोस मिळाला. कसे जगावे हे त्यांना समजले. आरोग्याच्या नियमांचे मोल उमगले.
डेल्टा कोव्हिडनंतर अनेकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. कोरोना विषाणू हा मुळातच श्वसनसंस्थेवर आणि त्यातही जास्त करून फुप्फुसावर आघात करतो. ज्यांना तीव्र प्रकारचा न्यूमोनिया झाला, विशेषतः डेल्टा या प्रकारच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अनेकांच्या फुप्फुसांची मोठी हानी झाली. 'पोस्ट कोव्हिड फायब्रोसिस' नावाच्या या कोव्हिडनंतर उद्भवणार्या विकारामध्ये फुप्फुसे घट्ट होतात.
श्वसननलिकांनाही हानी पोहोचते आणि मग अशा रुग्णांना दीर्घकालीन ऑक्सिजनची गरज भासते. ज्यां रुग्णांना ऑक्सिजन लागत नाही; पण त्यांना खूप काळ दम लागणे श्वास घ्यायला त्रास होणे, खोकला येणे अशा तक्रारी असतात. या तक्रारींसाठी नियमित उपचार आवश्यक असतो. अनेकांनी नियमित औषधोपचार घेऊन यावर मात केली आहे.
गेल्या महिन्यात आपल्याकडे जो ओमायक्रॉन नावाचा कोरोनाचा नवा अवतार आला त्याने अनेकांना गाठले. अनेक डॉक्टरांनाही त्याने सोडले नाही. कारण, ओमायक्रॉनचा संसर्ग दर हा डेल्टा कोरोनापेक्षा खूप जास्त आहे. या प्रकारच्या कोरोनामुळे ज्यांना ज्यांना त्रास झाला, त्यांना प्रचंड अशक्तपणा, थकवा आला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरडा खोकला सुरू झाला.
सुरुवातीच्या काळात याबरोबर हिरवा – पिवळा – पांढरा कफ पडणे असेही प्रकार झाले. कारण, अशा व्यक्तींमध्ये या विषाणूंबरोबर इतरही जीवाणू संसर्ग झाले. ओमायक्रॉन संसर्गानंतरसुद्धा अनेकांना अशक्तपणा आणि थकवा दीर्घकाळ जाणवत राहिला. या सर्व रुग्णांनी आपली तपासणी करून योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
कोरोना आपल्याकडे येऊन आता दोन वर्षे झाली. गेल्या दोन वर्षांत जगभर कोरोनासंबंधी अनेक अभ्यास झाले. त्यामध्ये असे दिसून आले की, ज्यांना ज्यांना आधीच दीर्घकालीन श्वसन विकार होता, त्यांनाही कोरोनाचा प्रसाद मिळाला. कोरोनानंतर ज्या ज्या श्वसनविकारांनी तोंड वर काढले. त्यामध्ये क्षयरोगाचा वरचा नंबर आहे.
त्यामुळे ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, आणि ज्यांच्या श्वसनाच्या काही तक्रारी पाठ सोडत नाहीत. विशेषत: अशक्तपणा – खोकला – दम लागणे – भूक न लागणे अशा तक्रारी असतील, तर अशा रुग्णांनी आपली चाचणी करून घेऊन उपचार सुरू करणे महत्त्वाचे ठरते.
क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. भारतासारख्या देशामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. आजही क्षयरोगामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. क्षयरोगामुळे होणार्या मृत्यूचा दर हा 3 मिनिटाला दोन इतका आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगातल्या जवळपास एक तृतीयांश लोकांना क्षयाचा कधी ना कधी संसर्ग झालेला असतो.
त्यामुळे एकंदरच आपल्याभोवती क्षयरुग्णांची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे जंतुसंसर्गाची भीती त्या मानाने अधिक असते. क्षयरोग हा मुख्यत्वे करून फुप्फुसांमध्ये होत असला, तरी तो लहान किंवा मोठे आतडे, सांधे, लसीका ग्रंथी, मणका, हाडे अशा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवातही होतो.
गेल्या दोन वर्षांतील कोरोना काळात कोरोनाशिवाय इतर आजारांकडे बर्यापैकी दुर्लक्ष झाले. त्यापैकी एक आजार म्हणजे क्षयरोग. ज्या लोकांना क्षयरोगाची औषधे सुरू होती, त्या लोकांनी ही औषधे भीतीपोटी किंवा नाईलाजाने हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या गैरसोयींमुळे बंद केली. त्यामुळे हा आजार बळावला.
ज्यांनी औषधे घेतली नाहीत, त्यांचा आजार तसाच राहिल्यामुळे त्यांच्या फुप्फुसांमध्ये हे जंतू जीवित राहिले. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये क्षयरोग पसरला. कोरोनामुळे वारंवार जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरातच राहिले. ज्या घरात वायुविजनाचा अभाव होता किंवा कोंदट वातावरण होते आणि जिथे क्षयाची बाधा झालेली एखादी व्यक्ती होती, तिथे हा रोग पसरण्याचा धोका अधिक होता आणि झालेही तसेच.
रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने आणि रुग्णांच्या सान्निध्यात आल्यामुळे काही लोकांना नव्याने क्षयाची बाधा झाली. मधुमेह हा जसा कोरोना होण्यास खतपाणी घालतो तसाच तो क्षयरोगालासुद्धा आमंत्रण देतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हा त्यातला एक समान दुवा आहे. या सर्व कारणांचा विचार करता कोव्हिड झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक वाढू लागले आहे.
भूक मंदावणे, वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, संध्याकाळचा बारीक ताप येणे, खोकला येणे, दम लागणे अशी क्षयरोगाची लक्षणे असतात. तुम्हाला कोव्हिड झाला असेल आणि कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या तक्रारी दिसत असतील, तर पुन्हा एकदा छातीचा एक्स-रे करणे, थुंकीची तपासणी करणे आणि काही रक्ताच्या चाचण्या करणे यावरून क्षयरोगाचे निदान होऊ शकते.
क्षयरोगावर उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याला घाबरून जायचे कारण नाही. नियमितपणे औषधोपचार घेणे आणि सकस आहार घेणे, या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या.
हल्ली, ओमायक्रॉनच्या संसर्गानंतर अनेकांचा कोरडा खोकला खूप दिवस राहतो. त्याबद्दल पुढच्या लेखात पाहू!
डॉ. अनिल मडके