मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे राज्यातील १९२७ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पूरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले असून महाड, नागोठणे व पेण येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत हे उद्या या परिसराचा दौरा करणार आहेत.
पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण १४ हजार ७३७ रोहित्रे बंद पडली होती.त्यापैकी ९ हजार २६२ रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या ४७४ वीज वाहिन्यांपैकी २६८ वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत.
बंद पडलेली ६७ वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी ४४केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र चालू झाले आहे.
प्रलयात जलमय झालेल्या परिसरातील महावितरणची संपूर्ण वितरण प्रणालीच पाण्यात बुडाली. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले. नदीला पुरामुळे आलेले तुफान झेलत, डोंगर दर्यातून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल त्यांच्या या कामगिरीचे डॉ. राऊत यांनी कौतुक केले.
महाड येथे महापारेषणचे दोन टॉवर पडले असल्याने संपूर्ण महाड तालुका अंधारात बुडाला आहे. मात्र पर्यायी व्यवस्था करत दवाखाने व पाणीपुरवठा योजनेला वीज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे.
तसेच उद्या सकाळ पर्यंत चक्राकार पद्धतीने महाड शहरातील ग्राहकांना वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.
हे ही वाचलं का?