Latest

भीमाशंकर : मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली

backup backup

भीमाशंकर, पुढारी वृत्तसेवा : भीमाशंकर मंदीर परिसरात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने  गुरुवारी रात्री मंदिराला वेढा घातला आहे. भीमाशंकर हे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असून मंदीर परिसर, सभामंडप आणि पवित्र शिवलिंग मंदिरात पाणीच पाणी झाले आहे.

भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर राडारोडा पसरला आहे. नाले, ओढे, भीमापात्राने मोठ्या प्रमाणात आल्याने मंदीर परिसरातील गायमुखाद्वारे पाणी गाभाऱ्यात गेल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

खेड तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी शुक्रवारी सकाळी पहाणी करून देवस्थान आणि प्रशासनाला सुचना देऊन मंदीर परिसर स्वच्छ करण्यासाठी आणि सुरक्षेतेबाबत सूचना दिल्या आहेत.

या वेळी देवस्थानचे विश्वस्थ रत्नाकर कोडीलकर ,चंद्रकांत कैदरे, मारुती लोहकरे, मारुती केंगले भोरगिरी-भीमाशंकरचे संरपच दत्तात्रय हिले आदि उपस्थित होते.

भीमाशंकर मंदिर परिसराच्या बाजूला असलेल्या डोंगरातून पुराचा लोट हा मंदीर परिसरात आल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सध्या मंदिराचे आणि परिसराचे भीमानदी पात्राचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे.

ही कामं व्यवस्थित आणि छोटे बंदिस्तपात्र केल्याने पाण्याचा प्रवाह अचानक वळून मंदीर परिसरात आला आहे. शिवलिंगदेखील पाण्याखाली गेल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. शुक्रवारी सकाळपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.

परिस्थिती नियंत्रणात असल्याचे घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी सांगितले. परंतु राडारोडा काढून परिसर मोकळा करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. कारण या ठिकाणी पडणारा पाऊस हा ३०० ते ४०० मिली मीटर आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे विकास आराखड्याचे काम हे अर्धवट अवस्थेत आहे. मुळात भीमा नदीपात्र हे बंधिस्त करण्यासाठी पुरात्व विभागाने भौगोलिक परिस्थितीचा विचार केलेला नाही, हे या घटनेतून उघड झाले आहे.

पहा व्हिडीओ : १६ वर्षांनंतर पुन्हा रंकाळा तलाव ओव्हरफ्लो

SCROLL FOR NEXT