भूस्खलन : पोलादपुरातील सुतारवाडीत भूस्खलन, ११ जणांचा मृत्यू | पुढारी

भूस्खलन : पोलादपुरातील सुतारवाडीत भूस्खलन, ११ जणांचा मृत्यू

रायगड; पुढारी वृत्तसेवा : पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. भूस्खलन मुळे मोठे नुकसान झाले.

यावेळी कोसळलेल्या दरडीखाली सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले. आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली आहेत.

या ठिकाणी बचावकार्य सुरू असून, केवनाळे येथील ६ जणांचा तर गोवेले सुतारवाडी येथे ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा :

गुरुवारी रात्री ही घटना कळल्यानंतर प्रशासनाने तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी आढावा घेतला असता कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल अर्धा मधोमध तुटून वाहून गेल्याचे दिसून आले.

याखेरीज, साखर बोरज येथील पुलदेखील तुटून वाहून गेल्याने गोवेले गावाकडे कोणत्याही प्रकारचे मदतकार्य पोहोचविणे प्रशासनास शक्य झाले नव्हते. मात्र स्थानिकांच्या मदतीने सकाळी बचावकार्याला सुरुवात झाली.

यावेळी दरडीच्या ढिगाऱ्याखालून केवनाळे येथून ६ जणांचे तर गोवेले सुतारवाडी येथील ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर गोवेले सुतारवाडी येथील १०, केवनाळे येथील २ आणि कुंभार्डे येथील १ अशा १३ जखमींना बाहेर काढण्यात आले असून, या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा :

Back to top button