Latest

भविनाबेन पटेल हिने टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक केले निश्चित

backup backup

भविनाबेन पटेल या भारतीय टेबलटेनिसपटूने टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. ती पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित करणारी भारताची पहिली टेबलटेनिसपटू ठरली आहे. तिने महिला एकेरीत रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पेरिक रॅन्कोव्हिकचा सरळ गेममध्ये पराभव केला.

उपांत्य पूर्व फेरीत ३४ वर्षीय भविनाबेन पटेल ने सर्बियाच्या रॅन्कोव्हिकचा ११ – ५, ११ – ६ आणि ११ – ७ असा पराभव केला. हा सामना १८ मिनिटे रंगला. आता ती उपांत्य फेरीत चीनच्या झँग मिआओ बरोबर भिडणार आहे. पण, तिचे कांस्य पदक निश्चित आहे.

टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये कांस्य पदकासाठी लढत ठेवण्यात येत नाही. दोन्ही उपांत्य फेरीत पोहचलेल्या खेळाडूंना कांस्य पदक दिले जाते.

भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी सांगितले की, 'भारताचे पदक निश्चित झाले आहे. उद्या सकाळी उपांत्य फेरीतील सामना या पदकाचा रंग कोणता असणार हे ठरणार आहे.'

आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या प्रशासकीय बोर्डाने २०१७ ला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनची विनंती मान्य केली होती. त्यानुसार तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला असून दोन्ही उपांत्य फेरीत गेलेल्या खेळाडूंना कांस्य पदक देण्याचा निर्णय झाला.

दिवसाच्या सुरुवातीला भविनाबेन पटेलने ब्राझीलच्या जॉयस दे ऑलिव्हेरियाचा १२ – १०, १३ – ११, ११ – ६ असा पराभव केला होता. त्यानंतर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये ती उपांत्य पूर्व फेरीत पोहचणारी पहिली खेळाडू ठरली होती.

वर्ग ४ श्रेणीतील खेळाडूंचे डोळे, हात योग्य प्रकारे काम करत असतात. त्यांना मणक्याचा खालील भाग किंवा जन्मजात मेंदूला दुखापत झालेली असते. दरम्यान, भविनाबेन पटेल म्हणाली, 'भारतातील लोकांच्या पाठिंब्यावर मी उपांत्य फेरीतील सामना जिंकू शकते. कृपा करुन मला पाठिंबा देत रहा जेणेकरुन मी उपांत्य फेरीतील सामना जिंकू शकेन.'

तिने साखळी फेरीत एक सामना जिंकला होता आणि एका सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ती बाद फेरीत पोहचली होती. तर दुसरीकडे सोनलबेन मनुभाई पटेलने आपले साखळी फेरीतील दोन्ही सामने गमावले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT