विराट कोहलीची ऑडी ठाणे पोलिसांकडे का पडून? | पुढारी

विराट कोहलीची ऑडी ठाणे पोलिसांकडे का पडून?

ठाणे : नरेंद्र राठोड

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची ऑडी कधी काळी त्याची अत्यंत लाडकी गाडी होती. पण ही आलिशान ऑडी कार गेली पाच वर्षे ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. विराटने ही कार सागर उर्फ शैगी ठक्कर नामक तरुणास विकली होती.

मात्र, ही कार विराटच्या नावावरून शैगीच्या नावावर होण्याअगोदरच ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने ठक्करवर आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर शैगीने विराट कोहलीकडून विकत घेतलेली कार ठाणे पोलिसांनी हरियाणा येथील रोहतक मधून २६ ऑक्टोबर २०१६ रोजी जप्त केली. तेव्हा पासून ही कार ठाणे पोलिसांकडे जमा आहे.

कधीकाळी विराटच्या बंगल्याबाहेर मोठ्या दिमाखात उभी राहणारी ही कार सध्या ठाणे जिल्ह्यातील काश्मीरा पोलीस स्टेशनच्या आवारात धुळात माखलेल्या स्थित उभी आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ४ ऑक्टोबर २०१६ च्या रात्री मीरा रोड येथे असलेल्या एका सात माजली इमारतीतल्या कॉल सेंटरवर धाड टाकून येथे चालणाऱ्या फसवणुकीच्या गोरखधंद्यांचा पर्दाफाश केला होता.

कोण आहे सागर उर्फ शैगी ठक्कर

या कॉल सेंटरमधून थेट अमेरिकन व इतर देशातील नागरिकांना फोन करून त्यांना टॅक्स चुकवल्याचा धाक दाखवून दंड भरण्याच्या नावाखाली हजारो डॉलर्सला फसवले जात होते. या कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार होता २३ वर्षीय तरुण सागर उर्फ शैगी ठक्कर. हा शैगी पूर्वी अमेरिकेतील एका टेलिफोन कंपनीत कामाला होता. त्यानंतर त्याने भारतात परतून काही काळ नोयडा मधील एका कॉल सेंटरमध्ये टीम लीडर म्हणून काम केले. त्यानंतर नोयडा स्थित कॉल सेंटर मधील काही लोकांना घेऊन त्याने २०१५ साली मीरा रोड येथे कॉल सेंटर सुरु केले.

हे कॉल सेंटर एका सात मजली इमारतीत सुरू करण्यात आले होते. या इमारतीचे महिन्याला तब्बल सात लाख भाडे देण्याची सहज तयारी शैगी ठक्करने दर्शवल्याने त्यास ही इमारत लगेच भाड्याने मिळाली. या इमारतीत कॉल टेक सोल्युशन, टेक सोल्युशन, युनिव्हर्सल आऊटसोर्सिंग सोल्युशन आणि लारेक्स इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड अशा विविध कंपन्यांच्या नावाखाली शैगीने आपले कॉल सेंटर सुरु केले.

फराटेदार इंग्रजी बोलता येणाऱ्या तरुणांचा शोध घ्यायचा व त्यांना आपल्या कॉल सेंटर मध्ये कामाला ठेवायचे असा सपाटा शैगीने त्यावेळी सुरु केला होता. त्याच्या या कामात त्याला त्याची बहीण रिमा ठक्कर हिने मोलाची मदत केली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून ठक्करने हजारो अमेरिकन नागरिकांना करोडो रुपयाला गंडवले होते. सदर कॉल सेंटर मध्ये एका दिवसाला तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल होत असे.

अखेर ठक्करच्या बोगस कॉल सेंटरची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी ४ ऑक्टोबर २०१६ रोजी या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून कॉल सेंटरच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या बाजाराचा पर्दाफाश केला. कॉल सेंटरवर पोलिसांची धाड पडताच शैगी विदेशात पळून गेला होता.

विराट कोहलीची ऑडी अडीच कोटीची

दरम्यान, ठक्करच्या संपत्तीचे विवरण ठाणे पोलिसांनी मिळवले असता त्यात अडीच कोटी रुपये किंमत असलेली एक आलिशान ऑडी कार त्याच्या हरियाणा येथील रोहतक येथील घरामोर मिळून आली. ठाणे पोलिसांनी २६ ऑक्टोबर २०१६ रोजी ही कार जप्त करून ठाण्यात आणली. पोलिसांच्या तपासात ही कार भारतीय क्रिकेटर विराट कोहलीच्या नावावर असल्याचे समोर आले.

शैगीने ही कार ७ मे २०१६ रोजी क्रिकेटर विराट कोहली कडून अडीच कोटीला विकत घेतली होती. केनियाच्या विरुद्ध क्रिकेट मॅच जिंकल्यावर विराटने हीच कार जल्लोष साजरा करतांना ग्राउंड मधून फिरवली होती. शैगीने ही कार एका एजंटच्या माध्यमातून विकत घेतली होती. ज्या एजंटच्या मध्यस्थीने ही कार शैगीने विकत घेतली होती तो एजंट शैगीच्या नावावर ही कार नोंदणी करून घेण्यासाठी सतत त्याच्या मागे ससेमिरा लावत होता.

मात्र ही गाडी नोंदणी करण्यासाठी शैगीच्या पॅन कार्डची गरज लागत होती आणि पोलिसांचा जाच वाढेल म्हणून शैगी आपले पॅन कार्ड देण्यास तयार नव्हता. त्याकरणास्तव ही गाडी विराटच्याच नावावर राहिली. तेव्हा पासून जप्त करण्यात आलेली विराट कोहलीची ऑडी कार गेले पाच वर्षे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या काश्मीरा पोलीस स्टेशनच्या आवारात धूळखात पडली आहे.

गर्लफ्रेंडचा हट्ट पुरवण्यासाठी घेतली होती कार विकत

सागर उर्फ शैगी ठक्कर याची दिल्लीत एक गर्लफ्रेंड राहत होती. ती विराट कोहलीची खूप मोठी चाहती होती. आपल्या गर्लफ्रेंडला विराट कोहलीची भेट घालून देण्यासाठी शैगीने गुडगावच्या एका क्लबमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीत शैगीने आपल्या गर्लफ्रेंडशी विराटची भेट घालून दिली होती.

याच पार्टीत विराट आपल्या आलिशान ऑडी कार मधून आला होता. ही ऑडी कार शैगीच्या मैत्रिणीला खूप आवडली आणि तिने आपल्याला अशीच कार हवी म्हणून शैगीकडे मागणी केली. त्यानंतर ७ मे २०१६ रोजी शैगीने ही कार एका एजंटच्या मध्यस्थीने विराट कडून विकत घेतली. ती आपल्या मैत्रिणीला भेट दिली.

ही कार घेतांना शैगीने ४० लाख रुपये रोख दिले होते. मात्र, कार विकत घेल्यानंतर काही दिवसातच शैगीच्या बोगस कॉल सेंटरच्या काळ्या धंद्याचा भांडाफोड ठाणे पोलिसांनी केला आणि शैगी भारताबाहेर पसार झाला. त्यानंतर ठाणे पोलिसांनी शैगीची ऑडी कार हरियाणातल्या रोहतक मधून जप्त करून ठाण्यात आणली. तेव्हा पासून ही कार ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयाबाहेर एक वर्ष पडून होती. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून ही ऑडी काश्मीरा पोलीस स्टेशनच्या आवारात धूळ खात पडली आहे.

दरम्यान, बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार शैगी ठक्कर यास ७ एप्रिल २०१७ रोजी ब्युरो ऑफ इमिग्रेशन पथकाकडून मुंबईच्या सीएसआय एयरपोर्टवर अटक करण्यात आली व त्याचा ताबा ठाणे पोलिसांना देण्यात आला. काही काळ तुरुंगात राहिल्यानंतर सध्या हाच शैगी ठक्कर जामीनावर बाहेर आहे.

Back to top button