श्रीनगर;पुढारी वृत्तसंस्था: काश्मीरमधील फुटीरवादी नेता आणि हुर्रियत कॉन्फरन्सचे संस्थापक सैय्यद अली शाह गिलानी (वय ९१) यांचे बुधवारी रात्री श्रीनगर येथील हैदरपोरा या निवासस्थानी निधन झाले. काश्मीरमधील फुटीरवादी नेता सैय्यद अली शाह गिलानी हे गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते.
गिलानी यांचा जन्म 29 सप्टेंबर 1929 काश्मीरमध्ये झाला. जमात-ए- इस्लामी या संघटनेचे सदस्य म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. त्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये तहरिक-ई-हुर्रियत या संघटनेची स्थापना केली.
हुर्रियत कॉन्फरन्सच्या सर्व गटांचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. जून 2020 मध्ये गिलानी यांनी हुर्रियत कॉन्फरन्समधून आपले अंग काढून घेतले होते. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाची माहिती दिली.
काश्मीरचे फुटीरवादी नेते आणि हुर्रियत कॉन्फरन्सचे संस्थापक सैय्यद अली शाह गिलानी हे पाकिस्तानी होते, अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी पाकिस्तानमध्ये एक दिवासाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच ट्विट करत भारताविरोधात गरळही ओकली आहे. तसेच पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही गिलानी यांना श्रद्धांजली वाहताना ते काश्मीरचे स्वातंत्र्यसेनानी होते, अशा जावईशोध लावला.
कुरैशी यांच्या ट्विटवर काँग्रेसने पलटवार केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की, मिस्टर कुरैशी तुम्ही जिहादच्या नावाखाली काश्मीरमधील निर्दोष नागरिकांना कट्टरपंथी करणारा तुमच्या गुप्तचर संघटनेचा एक सदस्यच गमावला आहे. काश्मीरमधील निर्दोष नागरिकांची हत्या करण्यासाठी पाकिस्तान आणि या देशातील सर्व प्रतिनिधींची नावे इतिहासात नोंद होतील, अशा शब्दात सिंघवी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना सुनावले आहे.
हेही वाचलं का ?