पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : विविध रंगाच्या फुलांनी सजवलेली शिवशाही बस…तुकोबांच्या पादुकांसाठी आकर्षक फुलांनी सजविलेले सिंहासन आणि 'ग्यानबा तुकाराम'चा गजर… अशा भक्तिमय वातावरणात तुकोबारायांच्या पादुका विठोबाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झाल्या. पहाटे नित्यनेमाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी साडे आठ वाजता पंढरपूरकडे तुकोबारायांच्या पादुका रवाना झाल्या.
अधिक वाचा :
या वेळी टाळ मृदुंग…विठोबाचा होणारा अखंड जयघोष; यामुळे देहू येथील मंदिर परिसर दुमदुमून गेला.
1 जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता. दरम्यान, कोरोनाचं संकट असल्याने यावर्षी देखील पालखी मुख्य मंदिरात विसावल्या होत्या.
मात्र पालखी सोहळ्याची परंपरा खंडित न होता ती जपली जावी. यासाठी 1 जुलै पासून देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे प्रतिकात्मक सोहळे पार पडले.
अधिक वाचा :
हे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात. परंतु, यावर्षी देखील करोनाचं संकट आहे. यामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
19 जुलै रोजी पादुका पंढरपूरकडे एसटीमधून रवाना झाल्या. पहाटे काकड आरती करण्यात आली. त्यानंतर पालखीसह उपस्थित मोजक्याच वारकऱ्यांनी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातली.
त्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहोचली. तिथे पादुकांची आरती करण्यात आली. आरतीनंतर एसटीमध्ये आकर्षक फुलांनी सजविलेल्या सिंहासनावर पादुका विसावल्या.
अधिक वाचा :
या वेळी 'ग्यानबा तुकाराम' व टाळ मृदुंगाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत एसटीमधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
अधिक वाचा :